चारा छावणीच्या पार्श्वभूमीवर लम्पीसाठी मोठं पॅकेज घोषित करा, सत्यजीत तांबेंची सरकारकडे मागणी!
संगमनेर, १७ ऑक्टोबर –
देशाच्या अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा लम्पी या आजाराने हैराण झाला आहे. बळीराजा आपल्या पशुधनाला कसं वाचवाव, याच विचारांत अडकलेला आहे. यातच केंद्र व राज्य सरकार कडून हवी तशी मदत होताना दिसत नाही!
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या 23 वर्षीय शेतकरी पुत्राने मात्र पशुधन वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. शरद वरकड हे या युवकांच नाव असून त्याने लोकसहभागातून लम्पी आजाराच्या अनुषंगाने क्वारंटाईन सेंटर सुरू केल आहे.
शरदच्या या पुढाकाराबद्दल महाराष्ट्राचे प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्याचं कौतुक केलं आहे. शरद च्या प्रयत्नांना कौतुकाची थाप देताना सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारचे सुद्धा या विषयाकडे लक्ष वेधले आहे. बळीराजचं पशुधन वाचवण्यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुष्काळात शेतकऱ्यांच्या पशुधनाला वाचवण्यासाठी सरकारकडून चारा छावण्यांवर पॅकेज घोषित केल जात, अगदी तसच लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन सेंटर उभारण्यासाठी मोठं पॅकेज घोषित करण्याची मागणी सत्यजीत तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
सत्यजीत तांबे यांनी ही शेतकरी हिताची मागजी सरकारकडून मान्य झाली पाहिजे, अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर सरकार कडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे! जर पशुधन वाचलं तरच शेतकरी वाचेल, या भावनेतून सरकारने सत्यजीत तांबे व लाखो शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे.