बदलापूर घटनेतील दोषींइतकीच कडक शिक्षा महाराजांच्या पुतळ्याचे काम करणाऱ्याला द्या! – सत्यजीत तांबे
भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राचा "स्वाभिमान" जमीनदोस्त होत आहे...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांवर आणि निविदा प्रक्रियेवर ज्यांच्या सह्या आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांवर बदलापूर घटनेतील दोषींइतकीच कडक शिक्षा देण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, या घटना पाहता जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा आपला देश नागरिकांसाठी दर्जेदार प्राथमिक सुविधाही उभारू शकत नाही हे सत्य लपून राहत नाही. सरकार कोणाचेही असो भ्रष्टाचारामुळे “स्वाभिमान” मात्र संपूर्ण महाराष्ट्राचा जमीनदोस्त होत आहे. ऊन, वारा, पाऊस यासोबतच परकीयांचे आक्रमण व तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही तग धरू शकला नाही हे फार मोठं दुर्दैव असल्याचे आ. तांबेंनी म्हंटले.
गावोगावच्या विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, आपल्या मर्जीच्या ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय लोकांकडून होणारे गैरप्रकार यामुळे अशा प्रकारच्या घटना सतत घडत असतात. यापूर्वी देखील गावागावातील रस्त्यांची झालेली अवस्था, मुंबईतील “मनोरा” या आमदार निवास इमारत, नवीन संसद भवनाला लागलेली गळती, सातत्याने होणारे रेल्वे अपघात, अनेक राज्यांत कोसळलेले पुल, देशातील ३ विमानतळांवर कोसळलेले छत आणि पुणे, मुंबई, दिली, नागपूर अशा शहरांत तुंबणारे पाणी यांसारख्या घडल्या घटनेचे दाखले यावेळी आ. सत्यजीत तांबे यांनी दिले.