सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवत अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. गेले दीड दशक त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र यंदाच्या निवडणुकीतून माघार घेत डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील व महाराष्ट्रातील ज्येष्ठांपासून सर्वच नेत्यांची आग्रही भूमिका होती की सत्यजीत तांबे यांना उमेदवारी मिळावी आणि अपेक्षेप्रमाणे ही उमेदवारी त्यांना मिळाल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महाराष्ट्रभरात सत्यजीत तांबे यांना मानणारा एक मोठा युवा वर्ग आहे. त्यांच्यामध्येही आनंदाची लाट आली आहे. युवक मोठ्या प्रमाणावर सत्यजीत यांना विजयासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. समाजमाध्यमांवर आज दिवसभरात युवकांच्या अशा आशयाच्या आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. विशेष म्हणजे यात काँग्रेससह सर्वपक्षीय युवकांचा समावेश आहे. तसेच अनेक युवक पक्षविरहित दृष्टीने सत्यजीत तांबे यांना मानताना दिसतात. तरुणाईत असलेली त्यांची ही क्रेजच त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देतेय.
राजकारणाचा वारसा असूनही काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत अगदी तळापासून एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करत गेल्या २२ वर्षांत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, बेरोजगारी, व्यवसाय युवकांचे अनेक प्रश्न तसेच महिलांचे प्रश्न देखील राजकीय व्यासपीठावर मांडत त्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. तसेच प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा विविध निवडणुकांमध्ये अभिनव संकल्पना राबवत काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचार-प्रसारसह बूथ मॅनेजमेंट व इतर महत्त्वाच्या जबाबदारऱ्या चोख पार पाडल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे एकूण २८ आमदार निवडून आले होते. त्यामुळे या यशात सत्यजीत तांबे यांचा देखील सिंहाचा वाटा आहे.
प्रचलित राजकीय नेत्यांपेक्षा वेगळा विचार करणारा एक अभ्यासू नेता, उत्तम संघटक आणि सजग राजकारणी अशी सत्यजीत तांबे यांची जनमानसातील प्रतिमा आहे. त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या व नुकतेच प्रकाशित झालेल्या सिटिझनविल या पुस्तकातून त्यांनी विकासाबाबतची त्यांची वेगळी दृष्टी दाखवून दिली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे नेतृत्व अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे तब्बल ५ जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे हे शिवधनुष्य ते लीलया पेलतील असेच चित्र आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडताना सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. असे समर्थन त्यांना मिळेल की नाही, हे आगामी काळात कळेलच. परंतु सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत हेही तितकंच खरं. किंबहुना विरोधी पक्षातील अनेक नेते सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वगुणांचं खासगीत बोलताना तोंड भरून कौतुक करताना दिसतात. एवढेच नाही, तर गेल्या महिन्यात झालेल्या त्यांच्याच पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीरपणे केलेलं कौतुक उभ्या महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यासारखं नेतृत्व विधानपरिषदेत दिसावं अशीच लोकभावना असल्याचं दिसतंय. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील त्यांचा विजय निश्चित असल्याचंच मानलं जात आहे. आगामी काळात राजकीय समीकरणं कशी जुळतील याची उत्कंठा तर असणारच आहे. त्यामुळे ही निवडणूक पार पडेपर्यंत नाशिक मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खिळून राहणार हे मात्र नक्की.