प्रतिनिधी ,
मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाने अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली. मात्र गेल्या १८ वर्षापासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषेचे अध्यासन केंद्र उभारले जाणार गेले नाही. जेएनयूत मराठी भाषा केंद्र व्हावे हे स्व. विलासराव देशमुख यांचे स्वप्न होते. मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळाला असून आता लवकरात लवकर जेएनयूतील मराठी भाषा केंद्राचे अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी केली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी भाषा केंद्र सुरू करण्यासाठी २००७- ०८ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जेएनयूला १ कोटीचा निधी दिला होता. मात्र १८ वर्ष होऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री यांनी याबाबत पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरवा केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जेएनयूत मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने नव्याने 10 कोटींचा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला दिला. मार्च मध्ये सांस्कृतीक कार्य विभागाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 10 कोटीचा निधी देण्यात आला, परंतु अध्यापही या अध्यासन केंद्राबाबत कुठलीही कार्यवाही सुरू झाली नाही.
यापूर्वी देखील आ. सत्यजीत तांबेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत जेएनयूतील छत्रपती शिवाजी महाराज इतिहास अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा अध्यासन केंद्र संयुक्तरित्या चालू करून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन करावे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे सीमोल्लंघन करण्याची मागणी केली होती.
मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांना हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे. जेएनयूत देशातील आणि विदेशातील अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. अशावेळी या विद्यार्थांना मराठी भाषेची रुची निर्माण करण्यासाठी मराठी भाषेचे अध्यासन केंद्राची मदत होणार असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.