राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची पडद्यामागील कहाणी ऐका सत्यजीत तांबेंच्या तोंडून!
भारत जोडो यात्रा, महाराष्ट्र – तिसरा दिवस
भव्य यात्रा, उत्तम नियोजन आणि बरंच काही….

आज यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस होता. आता यात्रा दुसऱ्या टप्प्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतेय! नांदेड जिल्ह्यातल्या जोरदार स्वागतानंतर आता परवा (११ नोव्हेंबर) हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
उद्या नांदेडला राहुलजींची मोठी सभा होणार आहे. त्यामुळे मग यात्रेच्या तयारीसह इतर तयारीसाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आज हिंगोलीला गेलो. यात्रेत काम करणाऱ्या सर्व कमिट्यांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. कारण या यात्रेमध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत राहुलजींसोबत प्रवास करणारे सुमारे १५० यात्री तर ५०० महाराष्ट्र यात्री म्हणजे जे फक्त महाराष्ट्रापुरते चालणार आहेत असे यात्री आहेत. या सर्वांची व्यवस्था वेगवेगळी करायची असते.
जिथे पहिले चालणारे यात्री आणि राहुलजी राहतात, त्याला कॅम्प- १ म्हणतात. तर जिथे महाराष्ट्र यात्री राहतात त्याला कॅम्प- २ म्हणतात. त्यांची व्यवस्था, त्यांसाठीच्या पोलीस परवानग्या, पासेस त्याचबरोबर त्यांच्या कपड्यांची, औषधांची व डॉक्टरांची व्यवस्था अशा अनेक छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात. त्यानंतर दिवसभरासाठी जे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून लोक येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था जिथे असते त्याला कॅम्प- ३ म्हणतात.
तर असे सगळे कॅम्प- १, कॅम्प- २, कॅम्प- ३ ची तयारी, त्याचप्रमाणे पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात यात्रेमध्ये जो अनुभव आलाय, त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या कशा भरून काढायच्या इत्यादी विषयांसंदर्भात आज हिंगोलीमध्ये दिवसभर बैठक चालू राहिल्या आणि नियोजन चालू राहीलं! हा फार मोठा अनुभव आहे. व्यवस्थापन शास्त्रामधला एखादा मोठा ग्रंथ होऊ शकतो, इतकी मोठी व्यवस्था त्यामागे चालू असते.
मीडियाच्या टीम असतात, सोशल मीडियाच्या टीम असतात, डॉक्टर्स असतात, कपडे धुण्याची एक वेगळी व्यवस्था असते. गाड्या चालू असतात, त्यानंतर ज्या राज्यांमध्ये ही यात्रा जाणार नाहीये, त्या राज्यांतील लोक येत असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार नाही, त्या जिल्ह्यांमधले लोक येत असतात. त्यांच्या व्यवस्थेबद्दलही समन्वय करायचा असतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर बिगर राजकीय स्वयंसेवी संस्थांमधून आणि समाजातील विविध घटकांचे लोक या यात्रेमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. त्यांचीही व्यवस्था करणं, त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
कंटेनरमध्ये पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था करणं, जनरेटरची व्यवस्था करणं प्रत्येक माणसाला साधारणपणे दिवसभरात किती पाणी लागतं त्याचा त्यानुसार पुरेशा पाण्याची व्यवस्था करणं! स्वयंपाकाचं पाणी वेगळं, बाकी वापरायचं पाणी वेगळं… बरोबर महिलाही मोठ्या संख्येने आहेत, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था एवढंच नाही तर यात्रा पुढे गेल्यानंतर लगेच मागे स्वच्छतेसाठी एक टीम कार्यरत असते. ही टीम लगेच तो रस्ता आणि परिसर स्वच्छ करते. जेणेकरून यात्रा पुढे गेल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा राहणार नाही.
त्यामुळे आजचा पूर्ण दिवस हिंगोलीमध्ये या यात्रेच्या नियोजनात आणि यात्रेचं पुढच्या टप्प्याचं नियोजन कसं करता येईल यामध्येच गेला.
भारत जोडो यात्रा भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाची आहे. पण आम्हा सर्व युवा कार्यकर्त्यांना आणि सर्वच तरुणांना ही यात्रा खूप काही शिकवून जातेय. व्यक्तिगत मी स्वतःदेखील यातून अनेक गोष्टी शिकतोय!