Satyajeet Tambe यांच्या नेतृत्वाखाली Jalgaonतील ग्रंथालय होणार युवकालय
युवकांच्या सर्वांगीण मार्गदर्शन आणि मदतीसाठी जळगावात साकारणार 'युनोव्हेशन सेंटर'
जिल्हा रुग्णालयामागे असलेले साने गुरुजी वाचनालय आपले रंग आणि रूप पालटत असून, लवकरच ते युवकांसाठीचे मार्गदर्शन अन् मदत केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी २.८५ कोटी रुपये दिले आहेत. ‘युनोव्हेशन सेंटर’ अर्थात यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर असे त्याचे नाव असेल. १८ ते ३० वयोगटाच्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथ आणि वाचनालय तर इथे असेलच, सोबतच
वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरीच्या संधी आणि उद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शनही केले जाईल. त्यासाठी पाच पूर्णवेळ तज्ज्ञ मार्गदर्शक नियुक्त केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना हे सारे एका छताखाली उपलब्ध व्हावे ही या केंद्रामागची संकल्पना आहे. विधान परिषदेचे सदस्य असलेले सत्यजित तांबे यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. शैक्षणिक आणि विविध संस्थांशी ही ते करार करणार आहेत. युनोव्हेशन सेंटरसाठी साने गुरुजी ग्रंथालयाची दुरुस्ती केली जाते आहे.
राजकीय, आर्थिक साक्षरता वाढीसाठीही प्रयत्न
* हे केंद्र केवळ मदत केंद्र नसेल तर त्या माध्यमातून युवा पिढीची राजकीय आणि आर्थिक साक्षरता वाढावी आणि त्यांची फसवणूक थांबावी असाही प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
* त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ या केंद्रांमध्ये बोलावले जातील. त्यांचे मार्गदर्शन आणि संवाद यातून ही साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जाणार आहे.
* तरुणांना तणावातून मुक्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन आणि शारीरिक आरोग्यासाठी मार्गदर्शनही या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे
* लवकरच केंद्राचे काम पूर्ण
* या उपक्रमातून अशा केंद्रांशी उत्तर महाराष्ट्रातील १० लाख युवक जोडले जावेत, असा प्रयत्न आहे. केवळ रोजगारापुरताच विषय नाही तर या तरुणांमधून’ जाण’ असलेली पिढी घडावी, असाही हेतू आहे. विविध साक्षरता हा त्याचाच भाग आहे.