सत्यजीत तांबेंनी उघड केले थोरात-तांबे कुटुंबाविरोधातील षडयंत्र
नाशिक- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांची बहुचर्चित पत्रकार परिषद आज नाशिकमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यानिशी अनेक धक्कादायक खुलासे केले. प्रदेश काँग्रेसमधील नाना पाटोळेंसह एक गट त्यांच्याविरोधात करत असलेली कट कारस्थाने उघड करत त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचत आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
याबाबतचा सर्व तपशील अगदी तारीख आणि वेळेसह त्यांनी माध्यमांसमोर मांडला. पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्याची मागणी होऊ लागल्यानंतर त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी नाशिकमधून सत्यजीत यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला देखील कळवले. परंतु पक्ष नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होऊ लागली. काही घडामोडी घडल्यानंतर अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत यांना एबी फॉर्म घेण्यास १० जानेवारी रोजी नागपूर येथे येण्यास सांगितले. त्यानुसार सत्यजीत तांबे यांचा प्रतिनिधी नागपूर येथे सकाळी पोहचला. त्याला तब्बल १० तासांच्या प्रतीक्षेनंतर सायंकाळी उशिरा मोहोरबंद पाकिटात एबी फॉर्म देण्यात आला. तो फॉर्म दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जानेवारी रोजी सकाळी सत्यजीत तांबे यांना मिळाला. परंतु पाकीट उघडल्यानंतर त्यात चक्क औरंगाबाद व नागपूर शिक्षक मतदारसंघाचे एबी फॉर्म आढळले. या दोन्ही एबी फॉर्म त्यांनी माध्यमांसमोर ठेवले.
हा प्रकार बघून सत्यजीत तांबे यांना धक्का बसला. पण तरीही त्यांनी निराश न होता याबाबत प्रदेश कार्यालयाला ताबडतोब कळवले व योग्य एबी फॉर्म देण्याची विनंती केली. परंतु त्यानंतर थेट १२ तारखेला म्हणजे ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना फॉर्म मिळाला आणि विशेष म्हणजे त्यावरही सत्यजीत तांबेंचं नाव नव्हतं. तो फॉर्म डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने होता, शिवाय त्यात दुसऱ्या पर्यायी उमेदवाराच्या रकान्यात स्पष्टपणे इंग्रजीत Nil असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच सत्यजीत तांबे इच्छा असूनही उमेदवारी अर्जासोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म भरू शकले नाहीत आणि त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणून ग्राह्य धरली गेली.
या सर्व घडामोडींचा अन्वयार्थ लावल्यास सत्यजीत तांबे यांना बाजूला पाडण्यासाठी पक्षातूनच कसे प्रयत्न सुरू होते, हे सहज लक्षात येते. गेल्या २२ वर्षांपासून पक्ष संघटनेसाठी झोकून देऊन काम करणारा युवा नेता, अशी ओळख असणाऱ्या सत्यजीत यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न पक्षातूनच सुरू असल्याचे यातून उघड दिसते आहे.
वास्तविक काँग्रेसमध्ये विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे दिल्लीतून ठरवली जातात. परंतु महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी उमेदवारीबाबतचा निर्णय तांबे परिवारावर सोडला होता. असे असूनही प्रदेश कार्यालयाने व नाना पटोले यांनी तांबे यांच्याबाबतीत दुजाभाव का केला? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रदेश कार्यालयाच्या या गंभीर चुकीला जबाबदार कोण आणि यावर पक्ष नेतृत्व काय कारवाई करणार आहे? असा रोखठोक सवालही सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.
याबद्दल नाना पटोले यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. सत्यजीत तांबे यांनी पुराव्यांनिशी मांडलेल्या आरोपांमुळे पटोले यांची बोलती बंद झाली की याबद्दल ते काही खुलासा करतील हे बघणे आगामी काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.