लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला टोकदार प्रश्न विचारावेत – डॉ.महेश झगडे
'प्रशासनाचे अंतरंग' विषयावर निवृत्त अधिकारी महेश झगडे यांचे माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन
नाशिक | माध्यमांनी आणि पत्रकारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्न व विकासासाठी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अभ्यास करून प्रशासनाला टोकदारपणे प्रश्न विचारावे. प्रसार माध्यमांनी प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करावी, असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास हब येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
‘प्रशासनाचे अंतरंग’ विषयावर महेश झगडे यांनी माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर निवृत्त माहिती संचालक शिवाजी मानकर, विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे मार्गदर्शक डॉ. कैलास कमोद, विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना झगडे म्हणाले की, लोकशाहीमध्ये लोकांना सर्व माहिती मिळायला हवी, हा लोकशाहीचा मुख्य उद्देश आहे परंतु प्रशासकीय अधिकारी ही वस्तुस्थिती सर्वांपुढे आणत नाही.
अनेक वेळा अधिकारी हे शासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांना आपले काम व अधिकारांचीदेखील पुरेशी माहिती नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकशाही कमकुवत होत चालली आहे.
प्रशासनाला वठणीवर आणण्याचे व झोपेतून जागे करण्याचे काम माध्यमे करत असतात. प्रत्येक देशातील माध्यमे किती प्रगल्भ आहेत यावर तेथील लोकशाहीचा पाया किती भक्कम आहे हे अवलंबून असते.
लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांसह सर्वसामान्य नागरिकांनीही घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत प्रशासनाला जाब विचारले पाहिजे यासाठी खोलात जाऊन अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम अधिक वेगाने होणे गरजेचे आहे. प्रशासनाला प्रश्न विचारून आपल्या भागाचा विकास साधणे गरजेचे आहे.
या वेळी झगडे यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महसूल विभाग आदी विभागातील कामांची माहिती देत यात माध्यमांनी कुठले प्रश्न विचारावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी डॉ. कैलास कमोद, विश्वास ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास निवृत्त माहिती संचालक शिवाजी मानकर, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.