प्रतिनिधी, जळगाव
महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांत जग बदलण्याची शक्ती आहे. या तत्त्वांचा सकारात्मक वापर केल्यास जगातील अस्थिरता आणि अशांतता दूर करता येईल. प्रत्येकाने गांधीजींच्या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर गांधीजींच्या रामराज्याच्या संकल्पनेतील शांततापूर्ण आणि समतोल भारत घडवता येईल, असे वक्तव्य इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जय हिंद लोकचळवळ आयोजित तीन दिवसीय जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या परिषदेला जैन हिल्स येथील गांधीतीर्थाच्या कस्तुरबा सभागृहात सुरुवात झाली. व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, जय हिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जय हिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गा तांबे, सचिव नामदेव गुंजाळ उपस्थित होते.
परिषदेमध्ये राज्यभरातून आलेल्या २५० युवक-युवतींनी सहभाग घेतला. गांधीजींच्या विचारांची जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आजही अत्यंत आवश्यकता आहे. गांधी विचार मानवतेचा आहे, जो पक्ष, जात, किंवा प्रांताच्या मर्यादा ओलांडतो. बाली, इंडोनेशियामध्ये गांधीजींच्या विचारांनी माझ्या जीवनात मोठा बदल घडवून साधना आश्रमाची स्थापना झाली, असे उदयन यांनी शेवटी नमूद केले.