प्रकाश आंबेडकरांचं छगन भुजबळांना पत्र! आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन!

भुजबळ यात्रेत सहभागी होणार का?

सध्या राज्यात ओबीसी-मराठा समाजामध्ये आरक्षणामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मराठा समाजाकडून सगोसोयऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे, तर ओबीसी समाजाकडून याला कडाडून विरोध केला जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीछगन भुजबळ यांना पत्र धाडण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन केलं असून मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीपासून २५ जुलै रोजी सुरू होणारी ही यात्रा त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पोहचणार असून दि. २६ जुलै रोजी ही यात्रा कोल्हापूरकड़े रवाना होणार आहे. कोल्हापूरमध्येच या यात्रेची सांगता होणार आहे. या पत्राच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे किंवा यात्रेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी होऊ शकता, असं या पत्रात म्हटलं आहे.

राज्यातील ओबीसी समाजाचा कोणताही मुद्दा चर्चिला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. गेल्या सुमारे वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर देत या मागणीला कडाडून विरोध दर्शविला. तसेच राज्यभरातील ओबीसी समाजाला एकत्रित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. यापूर्वी देखील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी ते सातत्याने उभे ठाकले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रकाश आंबेडकर यांना या आरक्षण बचाव यात्रेसाठी भुजबळ यांच्या नावाची आठवण होणे अपरिहार्य होते. कारण या यात्रेत अनुसूचित जाती आणि जमातींशी संबंधित मागण्यांसोबतच ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ओबीसींचा राजकीय सहभाग आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र हे देखील विषय प्रामुख्याने मांडले जाणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना लिहिलेल्या या पत्राला खूप महत्व आहे.

या पत्राला भुजबळ यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे भुजबळ यासंदर्भात नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यांची भूमिका या यात्रेच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.