छगन भुजबळ यांची एक भेट, नाशिकचा खेळाडू जाणार जर्मनीला थेट!
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाकडून नाशिकच्या आर्यन शुक्ल या खेळाडूस १० लाख रुपयांची मदत...
मुंबई/नाशिक: २५ ऑगस्ट २०२४-
जर्मनीमधील पॅडरबोर्न येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकच्या आर्यन शुक्ल या खेळाडूस राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जर्मनीत होणाऱ्या Mental Calculation World Cup-2024 या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला ही मदत देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आर्यनला १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दरम्यान भुजबळांच्या पुढाकारामुळे आर्यनसारख्या गुणवंत खेळाडूस जर्मनीला जात येणार असल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भुजबळांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
आर्यन शुक्ल व त्याच्या कुटुंबियांनी नुकतीच नाशिक येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महिला सक्षमीकरण मेळाव्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर शुक्ल कुटुंबाची ही मागणी मांडत मदत देण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान देत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आर्यन शुक्ल यास मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.
सन २०२२ मध्ये पॅडरबोर्न, जर्मनी मध्ये झालेल्या Mental Calculation World Cup चा तो विश्वविजेता आहे. तसेच यापूर्वी मिलान, इटली मध्ये आयोजित Lo Show Dei Record मध्ये आर्यनने “The fastest time to mentally add 50 five- digit numbers in 25.19 seconds” मध्ये करून Guinness World Records केलेले आहे. तसेच त्याने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षापासून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून अनेक पदके जिंकली आहेत. आगामी Mental Calculation World Cup-2024 साठी आर्यन जर्मनी येथे भारताचे प्रतिनिधित्व विश्वविजेता असताना करणार आहे. या स्पर्धेत जगातील फक्त ४० आघाडीचे सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेतात. १३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान जर्मनीमधील पॅडरबोर्न या शहरात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्यन आणि त्याचे वडील नितीन शुक्ल ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान जाणार आहेत.
आर्यनला अपेक्षित असलेली आर्थिक मदत मिळाल्याने तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चांगली कामगिरी करू शकेल आणि आपल्या नाशिकसह महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त छगन भुजबळ यांनी आर्यनला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.