छगन भुजबळ यांची अल्पसंख्याक समाजासाठीची “ही” मागणी शासनाकडून मंजूर
"अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI)" स्थापन करण्यास राज्यातील महायुती सरकारने मान्यता दिली...
नाशिक/येवला- २२ ऑगस्ट- राज्य सरकारने अल्पसंख्याक समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात २२ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना पत्र लिहून बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत या संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच राज्यातील अल्पसंख्याक समुदायांकडूनही याबाबत वारंवार मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखाली “अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI)” स्थापन करण्यास राज्यातील महायुती सरकारने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. तसेच यासाठी ६.२५ कोटी रुपयांच्या निधीस देखील मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे.
या संस्थेच्या माध्यमातून राज्यामधील मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू, सिख व पारशी या अल्पसंख्याक धर्मसमुदायांमधील सर्वसामान्य घटकांच्या उन्नतीसाठी नक्कीच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक समाजाला मोठा आनंद झाला असून नाशिक व येवला परिसरातील अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी राज्य सरकारबरोबरच छगन भुजबळ यांचे देखील आभार मानले आहेत.