नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोबाईल नेटवर्कही नाही; प्रवाशांच्या गैरसोयीवरून सुरू सत्यजीत तांबे यांनी सरकारला धारेवर धरले
देशातील महत्त्वाचे प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची धक्कादायक बाब आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधान परिषदेत उघडकीस आणली. “या विमानतळावर मोबाईलचे नेटवर्कही चालत नाही, मग प्रगत महाराष्ट्राचे हे कसले विमानतळ?” असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
सत्यजीत तांबे यांनी सभागृहात या विमानतळावरील दुरवस्थेचे वास्तव मांडले. ते म्हणाले की, “नवी मुंबई विमानतळावर सध्या एकाही सामान्य माणसाला स्वतःच्या गाडीशिवाय किंवा टॅक्सीशिवाय जाता येत नाही.
तिथे जाण्यासाठी बस नाही, रेल्वे नाही की मेट्रोची सुविधा नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या परिसरात मोबाईलचे नेटवर्कही मिळत नाही. साधे टॉवरही तिथे उभे करता आलेले नाहीत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
तांबे यांनी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरही नाराजी व्यक्त केली. “सरकारकडून मिळणारी उत्तरे ही अत्यंत गोलगोल आहेत. प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही,” असे त्यांनी नमूद केले.