‘माझी वसुंधरा’ अभियानात संगमनेर नगरपरिषदेची राज्यस्तरीय पुरस्कारावर मोहोर
मुंबईतील सरदार पटेल स्टेडियमवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते डॉ. मैथिली तांबे यांनी स्वीकारला बहुमान; अमृत शहरांच्या गटात संगमनेर नगरपरिषदेने मारली बाजी
मुंबई, २१ फेब्रुवारी : संगमनेर शहराने पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात आपली झेप सिद्ध केली आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी संगमनेर नगरपरिषदेला प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आज मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान स्वीकारण्यात आला. ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील अमृत शहरांच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संगमनेर नगरपरिषदेने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत राज्याच्या नकाशावर आपले नाव कोरले आहे.
या सन्मान सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या प्रतिष्ठित उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते डॉ. मैथिली तांबे यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यानंतर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे संगमनेरच्या एकूणच पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची पोचपावती आहे. पर्यावरणाची पंचतत्त्वे – भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश यांच्या संरक्षणासाठी नगरपरिषदेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रण या क्षेत्रांत केलेल्या अभिनव उपक्रमांमुळे हे यश मिळवणे शक्य झाले.
डॉ. तांबे पुढे म्हणाल्या, “हा पुरस्कार केवळ नगरपरिषदेचा नसून तो संपूर्ण संगमनेर शहराचा आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपासून ते प्रत्येक नागरिकाचा यात सहभाग आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक मेहनत घेतली. नगरसेवक किशोर टोकसे यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे सामूहिक यश आहे.”
पर्यावरण संरक्षण ही कोणतीही स्पर्धा नसून ती एक सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतूनच नगरपरिषद काम करत आहे. या पुरस्कारामुळे नगरपरिषदेचा उत्साह द्विगुणित झाला असून, भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी एक हिरवेगार, सुरक्षित आणि समृद्ध संगमनेर घडवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.या यशामागे संगमनेरचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही डॉ. तांबे यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कौतुक केले. ‘माझी वसुंधरा’ अभियान हे केवळ सरकारी योजना न राहता ती एक जनचळवळ बनली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही अशा यशस्वी नगरपालिकांच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना संगमनेर नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.
या पुरस्कारामुळे संगमनेर शहराचा आत्मविश्वास वाढला असून, पुढील काळात शहराला आदर्श नगरपालिका म्हणून विकसित करण्याची चळवळ आणखी जोमाने सुरू झाली आहे. डॉ. मैथिली तांबे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणापासून ते शहर विकासाच्या विविध क्षेत्रात संगमनेर नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास या वेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगरसेवक किशोर टोकसे यांनीही या सोहळ्यात उपस्थित राहून संगमनेरचा सन्मान वाढवला.sa