भुजबळांचा ७८ वा वाढदिवस ठरणार, ग्रामीण वाचनालयांच्या ग्रंथसमृद्धीचा आधार!
मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवसानिमित्त वाचन संस्कृतीची होणार जागृती, वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छारुपी मिळालेली पुस्तके जिल्ह्यातील वाचनालयांना देणार
नाशिक, दि.१२ ऑक्टोबर:- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ७८ वा वाढदिवस हा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी ज्ञानाच्या भेटीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म कार्यालय, नाशिक येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शुभेच्छुकांची भेट घेऊन सदिच्छा स्वीकारणार आहेत. परंतु यंदाचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम नसून ज्ञान आणि संस्कारांचा उत्सव ठरणार आहे.
नुकताच दि.९ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छुकांनी पारंपरिक भेटवस्तूंऐवजी पुस्तके भेट देण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. त्या वेळी विविध विषयांवरील शेकडो पुस्तके जमा झाली आणि त्यातून एक समृद्ध साहित्यसंग्रह तयार झाला. तो संग्रह पुढे वाचनालयांना भेट देण्यात आला ही कृती म्हणजे ज्ञानदानाच्या संस्कृतीचा सुंदर नमुना ठरली. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांचा यंदाचा वाढदिवस हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फुलांचा गुच्छ किंवा शाल न आणता पुस्तक भेट म्हणून द्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
या पुस्तक भेट उपक्रमातून जमा होणारी सर्व पुस्तके ग्रामीण भागातील वाचनालयांना भेट देण्यात येणार आहेत. अनेक ग्रामीण तरुणाईला, विद्यार्थी वर्गाला आणि वाचनप्रिय समाजघटकांना त्यामुळे ज्ञानाचे नवे दरवाजे उघडतील. आजच्या काळात मोबाईलच्या पडद्यावर अडकलेले मन पुन्हा एकदा पुस्तकांच्या पानांकडे वळावे, वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन घडावे हाच या उपक्रमामागचा खरा हेतू आहे.
वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू मंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवसाशी जोडला आहे. तो समाजात एक प्रेरणादायी आदर्श ठरेल.त्यांचे संपूर्ण आयुष्य हे सदैव “समाजासाठी काहीतरी देण्याच्या” वृत्तीने प्रेरित राहिले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हीच भावना पुस्तकांच्या रूपाने ते जनतेपर्यंत पोहोचत आहे.