वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका
संगमनेर वकील संघाच्या नव्या कार्यकारिणीचा सत्कार; न्यायव्यवस्थेच्या सुदृढतेसाठी व वकिलांच्या सन्मानासाठी संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी
संगमनेर, २१ एप्रिल — न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरणांची गरज असून, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुका वकील संघाच्या २०२५-२६ कार्यकाळातील नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमात अॅड. जगन्नाथ वामन (अध्यक्ष), अॅड. प्रसाद भडांगे (उपाध्यक्ष), अॅड. स्मिता सस्कर (महिला उपाध्यक्ष), अॅड. बबन नाईकवाडी (खजिनदार), अॅड. योगेश गुंजाळ (सचिव) आणि अॅड. स्वाती सांगळे, अॅड. अबरार देशमुख, अॅड. सचिन व्यवहारे, अॅड. किरण भोकनळ, अॅड. रवी वर्पे, अॅड. शिवाजी काकड या सदस्यांचीदेखील फेरनिवड करण्यात आली आहे. तर इतर सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यंदा एकमताने मागील कार्यकारिणीवरच पुन्हा विश्वास दाखवत फेरनिवड करण्यात आली आहे.
या वेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, “वकील हा समाजातील न्यायाचा कणा आहे. त्यांच्या सुरक्षिततेला कायदेशीर बळ मिळणं गरजेचं आहे. ‘वकील स्वरक्षण कायदा’ लागू करण्यासाठी विधी मंडळात आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत.”
१५ एप्रिल रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वकील संघाच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. गेल्या वर्षभरात वकिलांच्या हितासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन, निवडणूक न करता मागील कार्यकारिणीच्याच पुनर्निवडीसाठी सर्वसामान्य मतदान झाले. यामुळे २०२५-२०२६ या वर्षासाठी जुन्याच कार्यकारिणीकडेच जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तांबे यांनी वकील संघाच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत, त्यांच्या माध्यमातून समाजात न्यायप्राप्तीची प्रक्रिया अधिक सुलभ व विश्वासार्ह व्हावी, यासाठी संघटनांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
नवीन कार्यकारिणीने वकिलांच्या प्रश्नांवर लवकर निर्णय घेण्याची ग्वाही दिली असून, संघटनेच्या माध्यमातून प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यातील दुवा अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला. सत्कार समारंभाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील कायदा क्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला असून, नवीन कार्यकारिणीकडून कार्यकुशलतेचा नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे.