शिक्षणातील अडथळ्यांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुढाकार
जळगावमध्ये शिक्षण विभाग व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांच्या सोबत महत्त्वपूर्ण बैठक
जळगाव, १६ एप्रिल : राज्यातील शिक्षणव्यवस्थेत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. शिक्षकांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायमच प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत प्राथमिक शिक्षण विभागाशी संबंधित अंशतः सेवांतर, जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या, तसेच रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि अहेड मुख्याध्यापक पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.
शालेय अभ्यासक्रमाशी निगडित विषयांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नती, आठवड्यातील ‘शनिवार’ उपक्रमातील अडचणी, बीटस्तरावरील कार्यशाळा, तसेच शालेय सुट्ट्यांविषयी अधिक स्पष्ट वेळापत्रक तयार करण्याची गरज अधोरेखित झाली.
माध्यमिक विभागाच्या चर्चेत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांची भरती, नियोजनातील विलंब, तसेच सेवानिवृत्तीप्रक्रियेतील अडथळे यावर विशेष भर देण्यात आला. वेतन श्रेणी, रजा रेकॉर्ड, तसेच NPS अंतर्गत PF स्लिप्स ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणीही बैठकीत मांडण्यात आली.
राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीचा लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. कला विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील अडचणी, सेवा पुस्तिकांचे अद्ययावतकरण, व खासगी शाळांतील सेवाभोगी प्रकरणांवरही चर्चा झाली.
या बैठकीत सर्व मांडण्यात आलेले मुद्दे शासनाकडे सकारात्मक पध्दतीने नेण्यात येतील, अशी हमी आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांसाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. आमदार तांबे यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासन या तिन्हीही बाजूंच्या हिताचे रक्षण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशाप्रकारे, शिक्षणक्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी ही बैठक एक ऐतिहासिक पाऊल ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.