नाशकातील फुले स्मारकस्थळी ११ एप्रिलला उसळणार फुलेप्रेमींचा सागर!
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सोहळा!
नाशिक, दि. ९ एप्रिल :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरुवार दि. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजता व शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फुले शहरातील मुंबई नाका येथील फुले स्मारक येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.
नाशिकमधील सावित्रीबाई फुले चौकात छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या या स्मारकात २८ सप्टेंबर रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण पार पडले होते. या स्मारकात पहिल्यांदाच महात्मा फुले यांची जयंती साजरी होत आहे. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पूर्वसंध्येलाही करण्यात येणार अभिवादन
यामध्ये महात्मा फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवार दि.१० एप्रिल रोजी रात्री १० वाजता व शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फुले स्मारक, मुंबई नाका येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जयंतीदिनी भव्य उत्सव व मिरवणूक
तर ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास फुले प्रेमींनी फुले स्मारक, मुंबई नाका येथे बहुसंख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्याबद्दल नाशिकसह राज्यातील समस्त फुलेप्रेमी जनतेमध्ये प्रचंड आतुरता पाहायला मिळते आहे. भुजबळ यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा भव्य दिव्य असाच साजरा होईल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.