महाराष्ट्रात दृश्यकला विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा?
सत्यजीत यांच्या पुढाकाराने सकारात्मक हालचाली सुरू
मुंबई, ०६ मार्च : महाराष्ट्राला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र, दृश्यकला क्षेत्राला अद्याप स्वतंत्र विद्यापीठाचा लाभ मिळालेला नाही. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, अखेर या दिशेने ठोस पाऊल टाकले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी नुकतीच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि दृश्यकला विद्यापीठाच्या स्थापनेसाठी निवेदन सादर केले.
या बैठकीत विद्यापीठ स्थापनेची गरज, त्याचे फायदे आणि राज्यातील कला क्षेत्राच्या विकासासाठी त्याचे महत्त्व यावर विस्तृत चर्चा झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विद्यापीठ स्थापनेसाठी अभ्यास करून पुढील पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे.
राज्यातील अनेक कलाकार, विद्यार्थी आणि कला क्षेत्राशी संबंधित मान्यवरांनी या हालचालीचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील कलाकारांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, त्यांचे कला-संवर्धन व्हावे आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण मिळावे, यासाठी दृश्यकला विद्यापीठ महत्त्वपूर्ण ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
यासंदर्भात आ. सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या कला क्षेत्राचा विचार करता स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. या मागणीला मंत्री महोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे लवकरच राज्यातील युवा कलाकारांना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास आहे.”
महाराष्ट्र सरकारकडून लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्राशी संबंधित संस्था आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहिले आहे.