प्रतिनिधी, श्रीरामपूर
राजकारण हे मानवी व्यवहारांचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून, लोकशाही ही मानवी मूल्यांच्या नैतिकतेचा आधार आहे. प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणात धर्माचा वापर करणे हे अधर्म असल्याचे त्यांनी नमूद केले.
जळगाव येथे जय हिंद लोकचळवळ आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जय हिंद ग्लोबल कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशी लोकशाही सत्रात प्रा. बाविस्कर यांनी हे विचार व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, ईडीचे माजी उपसंचालक डॉ. उज्वलकुमार चव्हाण, जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, विष्णू भंगाळे, दुर्गाताई तांबे आणि समन्वयक शैलेंद्र खडके उपस्थित होते.
प्रा. बाविस्कर म्हणाले की, राजकारण हे सर्व क्षेत्रांचे नेतृत्व करत असते आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, ही आपल्या संविधानाची मुलभूत भावना आहे. परंतु, आजच्या काळात लोकशाही मूल्यांना हरताळ फासला जात आहे, आणि सत्ता धनिकांच्या हाती केंद्रीत होत आहे. त्यांनी सांगितले की, बहुजन समाज वाचन आणि विचार प्रक्रियेतून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा गुलामगिरी लादली जात आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा वेगळेपणा हा येथे घडलेल्या विचारवंतांच्या योगदानामुळे आहे. मात्र, आजच्या राजकीय अस्थिरतेच्या आणि गढूळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे चिंताजनक आहे. या बदलांसाठी तरुणांनी साहित्य, संस्कृती आणि लोकशाही या तिन्हींचे संवर्धन करण्यासाठी पुढे यावे, असेही प्रा. बाविस्कर यांनी सांगितले.
डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी समाजासाठी योगदान देण्याची भावना निर्माण होणे ही चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. दुर्गाताई तांबे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर नचिकेत पटवर्धन यांनी तरुणांनी गांधी विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. ग्रामीण विकासासाठी कामिनी सुहास यांनीही तरुणांना प्रेरित केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील २५० तरुण-तरुणी सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांचे शांतता, समता आणि मानवतेचे विचार आजही जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे उभारलेले गांधी तीर्थ हे खऱ्या अर्थाने या विचारांचे तीर्थक्षेत्र ठरले आहे, असे गौरवोद्गार आमदार सत्यजीत तांबे यांनी काढले.