सत्यजीत तांबे मराठी अनुवादित सिटीझनविल पुस्तक प्रकाशन सोहळा भविष्यातील अनाकलनीय अकल्पित राजकीय घडामोडींची नांदी?
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेला एक पुस्तक प्रकाशन सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला.
युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या सिटिझनविल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज्यातील दिग्गज नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. शहर विकासावरील सिटिझनविल या पुस्तकाचा अनुवाद करणाऱ्या सत्यजीत तांबे यांचे सर्वांनीच कौतुक केले. या पुस्तकाच्या माध्यमातून येथील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, जनता यांना शहर विकासाच्या नव्या संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
पण हा फक्त एक पुस्तक प्रकाशन सोहळाच होता की भविष्यात घडणाऱ्या काही अनाकलनीय, अकल्पित गोष्टींची ही नांदी होती? असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने हा सोहळा रंगला. ही रंगत खरंतर कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेपासूनच सुरु झाली होती. राज्यात नुकताच झालेला सत्तापालट ताजा असतानाच एकाच मंचावर सत्ताधारी व विरोधक अशा दोनही बाजूंच्या दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्याचा घाट सत्यजीत तांबे यांनी घातला आणि बहुतांश प्रमाणात तो यशस्वीही करून दाखवला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची मिळून महाविकास आघाडी झाली होती. पण सत्यजीत तांबे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या तीन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणू पाहत होते. त्यातही भाजपचे तर थेट राज्यातील सर्वोच्च म्हणावे असे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं.
सत्तापालट झाल्यानंतर नवीन सरकार असल्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यग्रता अधिक आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आपण बघतोय देवेंद्र फडणवीस सहसा खासगी कार्यक्रमांना उपस्थित नसतात. इतका मोठा वेळ त्यांनी एखाद्या खासगी कार्यक्रमाला किंबहुना एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला दिल्याचं आपण पाहिलं नसेल. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून ते बहुतांश वेळ मंत्रालयातच दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमात दिसतात. छोट्या छोट्या मंडळांच्या गणोशोत्सवात, नवरात्रोत्सवातही आरतीला हजेरी लावणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला. पण उपमुख्यमंत्री फडणवीस मात्र मंत्रालयातच दिसतात. मग असं असताना त्यांनी चक्क २ ते ३ तास एखाद्या कार्यक्रमासाठी, तेही एका काँग्रेसच्या नेत्याच्या आणि त्यातही खुद्द माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाच्याच्या कार्यक्रमाला उपस्थित लावणं, तिथे भाषण करणं! हे सगळंच नक्कीच दिसतं तितकं सरळ नाही. शिवाय देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवार का आले नसावेत, ऐनवेळेला त्यांनी कार्यक्रमाला दांडी का मारली असेल? यामागे नेमके काय धागे-दोरे असतील? हेही गुलदस्त्यातच आहे.
पण या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी फक्त उपस्थितीच लावली नाही, तर अतिशय खुसखुशीत आणि चिमटे काढणारं भाषणही केलं. आपल्या भाषणात त्यांनी सत्यजीत तांबे यांचं तोंडभरून कौतुक केलं, महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणाऱ्या सत्यजीत यांचं वेगळेपण त्यांनी अधोरेखित केलं. पण यापुढेही जाऊन त्यांनी मंचावर बसलेले बाळासाहेब थोरात यांना उद्देशून एक तक्रारवजा सूचक विधानही केलं. ते जास्त लक्ष्यवेधी ठरलं! ते म्हणाले की ‘बाळासाहेब, सत्यजीत यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचा डोळा मग त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात.’ या त्यांच्या विधानावर बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल हास्य केलं. सभागृहातही मोठा हशा पिकला. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं.
हे विधान त्यांनी फक्त सत्यजीत तांबे यांना खुश करण्यासाठी केलं की खरोखर बाळासाहेब थोरात यांना सूचक इशारा दिलाय की सत्यजीत तांबेंनाच भाजपात येण्याची ‘ऑफर’ दिली? यातलं नेमकं काय खरं, पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी एका काँग्रेस नेत्याच्या कार्यक्रमाला आवर्जून वेळ देणं, सत्यजीत तांबे यांचं कौतुक करणं आणि तेही थेट बाळासाहेब थोरात यांच्यासमोर! या सर्वांमागे राजकारण अजिबात नाही, असं कोणाला वाटत असेल तर त्याच्यासारखा निरागस तोच. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहिले असते तर यात आणखी काही ‘ट्विस्ट’ नक्कीच बघायला मिळाले असते. पण इतक्या महत्त्वाच्या आणि तेही मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला असलेली त्यांची अनुपस्थिती देखील बरंच काही सांगून जाते.
या सर्व पार्श्वभूमीवर कार्यक्रमानंतर सत्यजीत तांबे यांना पत्रकारांनी फडणवीसांच्या विधानाबद्दल छेडल्यावर त्यांनी अतिशय चतुराईने थेट उत्तर देणं टाळलं खरं! पण काँग्रेस पक्षात त्यांना योग्य संधी मिळत नसल्याची त्यांच्या मनातील खदखद, त्यांची पक्षात होत असलेली घुसमट लपून राहिलेली नाही.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या २००७ व २००९ च्या निवडणुकीत त्यांच्यावर अन्याय झाला. पण सत्यजीत यांनी कमालीची शांतता, संयम आणि समजूतदारपणा दाखवला आणि त्याचबरोबर आपल्या कामातून या सर्वांना उत्तर देण्याचा मार्ग त्यांनी निवडला. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले. सत्यजीत तांबे हे फक्त एक युवा नेता किंवा एखाद्या राजकीय घराण्यातून आला म्हणून ‘बाय डिफॉल्ट’ बनलेला राजकारणी इतका मर्यादित विचार करण्यासारखं प्रकरण नक्कीच नाही. फक्त राजकारण एके राजकारण न करता राज्यातील युवकांचे भवितव्य सुधारण्यासाठी, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हर तऱ्हेचे प्रयत्न करत असताना संपूर्ण राज्यात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला कोणतंही मोठं पद हाताशी नसताना संपूर्ण राज्यभर लोकप्रिय असलेले ते कदाचित एकमेव युवा नेते असतील.
असं असूनही काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. हे दुर्लक्ष होतंय की ‘केलं जातंय’ हाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्याकडे होणारं दुर्लक्ष ही नजरेत भरणारी बाब आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी ‘सिटिझनविल’च्या प्रकाशन कार्यक्रमाला राजकीय नेत्यांना आमंत्रित करताना महाविकास आघाडीचे नेते न बोलावता थेट भाजपच्या व काँग्रेसच्या नेत्यांना का आमंत्रित केलं, यातून त्यांना काय सुचवायचं होतं? त्यातही फडणवीसांनी तर थेट मुद्द्यालाच हात घातला. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे राज्याच्या राजकारणातील आगामी संभाव्य अनपेक्षित, खळबळजनक घटनांची नांदी तर नाही ना, अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया अशा देशपातळीवरील तरुण काँग्रेस नेत्यांची उदाहरणे ताजी आहेत. काही नाराज आहेत तर काहींनी पक्ष सोडला. या सर्व घडामोडींच्या माध्यमातून दिसणारी पडझड रोखण्यासाठी काँग्रेसने उचित पावले उचलणं नक्कीच गरजेचं झालंय.
‘सिटिझनविल’ पुस्तकाच्या अनुवाद प्रक्रियेबद्दल बोलताना सत्यजीत तांबे यांनी सांगितलं होतं की मी जेव्हा अमेरिकेत असतांना गॅविन न्यूसम यांचं मूळ पुस्तक वाचलं तेव्हा मी इतका भारावून गेलो की तेव्हा वाटलं होतं आता तडक निघून भारतात परतावं आणि या पुस्तकातील गोष्टी आपल्या देशातही अंमलात आणाव्यात. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सत्तेत थेट सहभागी असणं, एखाद्या कार्यक्षम पदावर असणं गरजेचं आहे. ही संधी आगामी काळात त्यांना कोण देईल? बाळासाहेब थोरात याचा गांभीर्याने विचार करतील की देवेंद्र फडणवीस ‘बाजी’ मारतील हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.