बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी आमदार अतुल बेनके यांची मागणी
जुन्नर तालुक्यातील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ या पाणीपुरवठा योजनेस जल जीवन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.
आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जल जीवन कार्यक्रमांतर्गत बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या योजनेचा टप्पा – १ रक्कम ३६ कोटी ३५ लाख ३४ हजार रुपये व टप्पा -२ रक्कम ६१ कोटी ४२ लक्ष ८१ हजार ३०० रुपये किंमतीस तांत्रिक छाननी उपसमितीने तांत्रिक मान्यता यापूर्वी दिलेली आहे तसेच मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभाग यांनी २डिंसेबर २०२१ व १ डिसेंबर २०२१ रोजी सदर पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास व आराखड्याला तांत्रिक समितीची मान्यता मिळावी याकरिता मुख्य अभियंता तथा विशेष कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केलेला असल्याने सदर पाणीपुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.
बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा – १ व टप्पा – २ चा लाभ उंब्रज, आळे,खामुंडी, गायमुखवाडी, पिंपरी पेंढार, नवलेवाडी, पिपळवंडी, वडगाव आनंद, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, बेल्हे,गुळुंजवाडी, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या भागातील गावांना होणार असून सदर योजना मंजूर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व विविध गावच्या लोकप्रतिनिधी यांच्या समवेत वारंवार बैठका घेतल्या असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.