सत्यजीत तांबे: महाराष्ट्र काँग्रेसच्या युवा व ज्येष्ठ नेत्यांच्या वादातील एक आघाडीचं नाव!
राजस्थान काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक गहलोत विरुद्ध युवानेते सचिन पायलट हा वाद आपल्याला माहीतच आहे. आता याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळतेय.
सत्यजीत तांबे हे नाव सध्या घराघरात पोहोचलं आहे, ते त्यांच्या इंस्टाग्रामवरील व्हायरल झालेल्या प्रेरणादायी रिल्स मुळे! त्यांचे अभ्यासू व प्रेरणादायी व्हिडीओ लाखो लोक पाहत आहेत, अनेकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया देखील त्यांना मिळत आहेत. त्यांनी नुकतेच कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी लिहिलेल्या ‘सिटीझनविल या पुस्तकाचे मराठी अनुवाद केले. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील मोठ्या दिमाखात पार पडला.
जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील असाल तर तुम्हाला ते एक उद्योजक वाटतील आणि ही तुमची चूक ठरेल! किंबहुना, सत्यजीत तांबे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकदवान अशा ‘थोरात-पाटील’ परिवाराच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आहेत. त्यांचे मामा, मागच्या सरकारमधील महसूलमंत्री व विद्यमान विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बाळासाहेबानंतर हा राजकीय वारसा इतक्या कमी वयात सत्यजीत तांबेच पुढे नेतील असा सर्वांचा समाज आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सत्यजीत तांबे जिल्हा परिषद निवडणुक जिंकून आले होते व लागोपाठ दोन वेळा ते वेगवेगळ्या गटांतून अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य देखील झाले. त्यावेळी कर्तृत्व असूनही वयाचं कारण पुढे करून अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याची संधी त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आली. पण यातून निराश न होता सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये विविध पदांवर सातत्याने काम करत राहिले आणि 2018 मध्ये त्यांनी पक्षाच्या लोकशाही प्रक्रियेतून निवडून येत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. एनएसयूआय व युवक काँग्रेसमधून निवडुन आलेल्या तसेच इतर युवकांचं संघटन करणारा, त्यांना स्थानिक पातळीवर तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तयार करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा युवानेता म्हणून त्यांची ओळख या कार्यकाळात झाली. सत्यजीत तांबे यांना काँग्रेसमध्ये त्यांच्या उत्तम संघटनात्मक कार्यामुळे ओळखलं जातं. 2008 मध्ये राहुल गांधींनी सचिन पायलट व ज्योतिरादित्य सारख्या युवानेत्यांना तयार केलं होतं, त्या यादीत सत्यजीत तांबे देखील होते.
पण आज काँग्रेसमध्ये 69 वर्षे काम केल्यानंतरही बाळासाहेब थोरात हे पद सोडायला तयार नाही! त्यांना स्वतःवर ‘घराणेशाही’ चा आरोप होण्याची भीती वाटत असल्याने ते सत्यजीत तांबेंना निवडणुकीची उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवत आहेत.
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी आता युवानेत्यांना नेतृत्वाची संधी दिली पाहिजे, तरच 18-24 वयोगटातील मतदार काँग्रेससोबत जोडला जाईल, यावर सत्यजीत तांबे नेहमीच बोलत असतात. त्यांची सध्या असणारी लोकप्रियता आणि संघटनेवर असणारी मजबूत पकड यामुळेच काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांची भीती वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात काँग्रेस मागे पडत चालली आहे, म्हणूनच तर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी नंतर काँग्रेस पार चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते व मतदारांना सारखं असं वाटत आहे की महाराष्ट्रात काँग्रेस पूर्वीसारखी राहिली नाही, इथले ज्येष्ठ नेते आता विश्वाससार्हता गमावत आहेत.
त्यामुळे राजस्थाननंतर आता महाराष्ट्र काँग्रेस टिकवणं हे नवीन आवाहन आता राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर असणार आहे. यातून त्यांनी लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर हिमाचल प्रदेश मध्ये झालेला विजय जास्त काळ टिकणार नाही! आता हे वादाचं वादळ लवकरच केरळमध्ये देखील जाण्याची शक्यता आहे!