संगमनेरच्या स्वाभिमानाला ठेच! कीर्तनकाराच्या अश्लाध्य टीकेवर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक
माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यारील अश्लाध्य टीका आणि देण्यात आलेली मारण्याची धमकी यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात आणि वारकरी संप्रदायात तीव्र पडसाद
संगमनेर, १९ ऑगस्ट : राजकीय व सामाजिक क्षेत्रात एका कीर्तनकाराच्या अश्लील व भडक टीकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केलेल्या अमर्याद टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर निदा झाली आहे. विशेषतः वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी या घटनेला तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या प्रकरणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “बाळासाहेब थोरात हे एका संपूर्ण पिढीचे नेतृत्त्व आहेत. त्यांच्याविरुद्ध राजकीय टीका होऊ शकते, पण अश्लील भाषा आणि मारहाणाची धमकी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांशी सुसंगत नाही. संत-महंतांच्या भूमीत असलेल्या वारकरी परंपरेला ही घटना कलंकित करते.”
सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणाचा संदर्भ फक्त राजकीय न ठेवता, संगमनेर तालुक्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केला आहे. त्यांनी नमूद केले की, “संगमनेर हे केवळ राजकारणाचे केंद्र नसून, सहकार, शिक्षण, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील आदर्श उदाहरण आहे. येथील लोकांनी केलेल्या परिश्रमाचा हा अपमान कोणीही सहन करणार नाही.”
त्यांनी संगमनेरच्या उल्लेखनीय योगदानाचा आढावा घेतला:
सहकारी चळवळ: शहरातील सहकारी बँकांमध्ये ७००० कोटी रुपयांच्या ठेवी, दुध उत्पादनात दररोज ९ लाख लिटरचे योगदान.
शैक्षणिक केंद्र: ५ मेडिकल कॉलेजेस आणि २५,००० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था.
कृषी व उद्योग: दररोज ७ लाख अंडी उत्पादन, प्रवरा नदीच्या जलसंधारणासाठी केलेले प्रयत्न.
राजकीय वैराच्या पलीकडे: संगमनेरचा सामूहिक स्वाभिमान
तांबे यांनी जोर देत म्हटले की, “हा केवळ बाळासाहेब थोरात यांच्यावरील हल्ला नसून, संपूर्ण संगमनेरच्या स्वाभिमानावरचा प्रहार आहे. या तालुक्याने दुष्काळातून सुजलाम सुफलाम होण्याचा प्रवास केला आहे. भाऊसाहेब थोरात ते बाळासाहेब थोरात यांनी या भूमीच्या विकासासाठी जे योगदान दिले, ते इतिहासाला पुसून टाकता येणार नाही.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, “काही लोकांचा राजकीय द्वेष संगमनेरच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. पण येथील जनतेने सदैव प्रगतीच्या मार्गावर एकत्रितपणे काम केले आहे. आजच्या घटनेवर संपूर्ण समाजाचा निषेध आहे.”
‘स्वाभिमानी संगमनेर हे सहन करणार नाही!’
सत्यजित तांबे यांनी शेवटी स्पष्ट शब्दांत सांगितले, “या प्रकारचे अमर्याद आचरण राजकारणात स्वीकार्य नाही. संगमनेरच्या लोकांनी आपल्या परंपरा, संस्कृती आणि प्रगतीचा आदर केला पाहिजे. आम्ही या घटनेचा निर्णायक विरोध करतो आणि संबंधितांना कठोर न्याय मिळेल याची खात्री देतो.”
या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू आहे. वारकरी समाज, स्थानिक नेते आणि जनता या सर्वांनी एकवाक्य होऊन अशा वर्तणुकीला नकार दिला आहे.