शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्यजीत तांबे आक्रमक; शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्यासोबत चर्चा

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे वेतन, पदोन्नती आणि प्रशासकीय अडचणी यांसारख्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी शालेय शिक्षण विभागाचे सचिव मा. रणजितसिंह देओल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिक्षण विभागातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन सचिवांनी दिले आहे.

या बैठकीत प्रामुख्याने शिक्षक पदोन्नतीसाठी असलेली TET ची अनिवार्यता शिथिल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अनेक अनुभवी शिक्षक या जाचक अटीमुळे पदोन्नतीपासून वंचित आहेत, त्यांना दिलासा देण्याची मागणी तांबे यांनी केली. तसेच, अंशतः अनुदानावरील शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांच्यावर ओढावलेली आर्थिक ओढाताण थांबवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला.

महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या वेतन आणि पेन्शनचा प्रश्नही यावेळेस ऐरणीवर आला. यासोबतच, कनिष्ठ महाविद्यालयातील आयटी शिक्षकांना त्यांच्या पात्रतेनुसार सामावून घेऊन त्यांचे नियमित वेतन सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. ऑनलाइन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याचे निर्देशही यावेळी चर्चेत घेण्यात आले.

आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांसाठी ‘एकस्तर वेतनश्रेणी’चा शासन निर्णय (GR) लवकरात लवकर निर्गमित करावा, अशी मागणी करत तांबे यांनी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. नाशिक विभागातील थकीत देयके मंजूर करणे आणि नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

या सर्व बाबींवर शासन स्तरावर लवकरच योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास सचिव रणजितसिंह देओल यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.