येवला-मतदारसंघात अतिवृष्टी, मंत्री भुजबळांकडून थेट पाण्यात उतरत नुकसानीची पाहणी व येवलेकरांना आधार

येवला-लासलगाव मतदारसंघात कोसळलेल्या मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची भुजबळांकडून पाहणी आणि प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबापर्यंत शासकीय मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना 

येवला, २८ सप्टेंबर – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी केली असून, गुडघ्याएवढ्या पाण्यात उतरून त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला व तातडीने मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अंदरसूल परिसरात कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असताना, भुजबळ यांनी प्रथम पूरग्रस्त भागातील नागरिक व पशुधन वाचविण्यास प्राधान्य देत शासन जनतेच्या सोबत आहे याचा संदेश दिला.

 

मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांबरोबर पाहणी करताना अंदरसूल येथील परिस्थिती स्वतः हाती घेतली. या भागात गुडघ्याएवढे पाणी वाहत असतानासुद्धा त्यात उतरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्यांची थेट ऐकणी केली. त्यानंतर त्यांनी येवला शहरातील हुडको कॉलनीतील घरांमध्ये पाणी शिरलेल्या भागात जात नागरिकांना दिलासा दिला. सावरगाव परिसर, पाटोदा शहरातील शॉपिंग सेंटर भागासह निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी, विंचूर येथे नुकसानग्रस्त भागाची सविस्तर पाहणी करून तातडीने मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती:

या संदर्भात मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत तालुक्यात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पोलिस, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने मदतकार्यात सहभागी व्हावे, तसेच प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून तातडीने आवश्यक हालचाली करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही परिस्थिती आपण अतिशय गांभीर्यपूर्वक हाताळत असून, लोकांचे जीव वाचविणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.

 

आपत्तीग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीचे आश्वासन:

मंत्री भुजबळ यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदूळ, तसेच ज्याला गहू नको असतील त्याला तेवढेच तांदूळ वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. याबरोबरच प्रति कुटुंब तीन किलो डाळ उपलब्ध करून दिली जाणार असून, आवश्यकतेनुसार आपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी भर दिला की, नुकसानभरपाईच्या प्रक्रियेपूर्वी मानवी जीवनाचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि सर्व घटकांना मदत दिली जाईल.

 

 

या पाहणी कार्यक्रमादरम्यान प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विशाल नाईकवाडी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. मंत्री भुजबळ यांनी या संकटकाळात प्रशासनाने जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून कार्य करण्याचे आवाहन केले असून, पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये आशेचा संचार झाल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.