महाराष्ट्रात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीचे संकट व मोठ्या शहरांतील प्रकल्पांवरून आमदार तांबे सभागृहात आक्रमक

दररोज ७९४ नवी वाहने, पण वाहतूक कोंडीवर नियंत्रणाचे प्रयत्न अजूनही अपुरे, यावर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

मुंबई, १६ जुलै : महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर समस्येच्या घडीला आली आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बाब पटवून दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या ४ कोटी ९५ लाख वाहनांची नोंद झाली आहे, तर मुंबईमध्ये दररोज सरासरी ७९४ नवीन वाहनांना रजिस्ट्रेशन मिळत आहे. या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर रूप धारण करत आहे.

काय बोलले सत्यजीत तांबे ?
सभागृहात बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्प यावर मुद्दे उपस्थित केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ वाहनांच्या संख्येबद्दल नव्हे तर वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबद्दलही गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सरकारकडे सुचवले की, जनजागृती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारावर भर
या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकार मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करण्याच्या दिशेत काम करत आहे. सामंत यांनी स्पष्ट केले की, “पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांशिवाय वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. म्हणूनच मुंबईसह इतर मेट्रो शहरांमध्ये मेट्रोमार्गांचे जाळे वाढविण्यात येणार आहे.” त्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकल्प दीर्घकालीन उपाय ठरू शकतात.

पोलिस, परिवहन आणि महसूल विभागाच्या समन्वयाची गरज
वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिस, परिवहन आणि महसूल विभाग एकत्रित कार्य करत असल्याचे सामंत यांनी नमूद केले. मात्र, या एकत्रित कारवाईमुळे काही ठिकाणी वाहतूक जाम होण्याचे प्रकारही घडतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वाहतूक व्यवस्थापनाच्या नवीन योजना आखण्यासाठी काम करेल.

सार्वजनिक सहभाग
सरकारच्या योजनांप्रमाणे, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या विस्तारासोबतच नागरिकांनीही वाहनांच्या वापरात संयम बाळगणे गरजेचे आहे. शहरांमध्ये कारपूल, सायकलिंग लेन आणि पादचारी मार्ग यासारख्या पर्यायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सत्यजीत तांबे यांनी यावर जोर देत सांगितले की, “समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि नागरिक या दोघांनीही जबाबदारीने काम केले पाहिजे.”
वाहतूक कोंडी ही केवळ एक शहरी समस्या नसून ती आर्थिक नुकसान, वायू प्रदूषण आणि जनजीवनाचा ऱ्हास यालाही कारणीभूत ठरते. म्हणूनच, सरकारच्या प्रयत्नांसोबत प्रत्येक नागरिकाने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.