महाराष्ट्रातील वकिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार तांबे विधानपरिषदेत आक्रमक
आमदार सत्यजीत तांबे यांची वकिलांच्या सुरक्षेसाठी बिहार-झारखंडच्या मॉडेलच्या धर्तीवर स्वतंत्र कायद्याची आग्रही मागणी
मुंबई, ९ जुलै : आमदार सत्यजित तांबे यांनी वकिलांच्या अडचणी विधान परिषदेत उपस्थित केले. राज्यातील वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी लवकर निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी वकिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. वकिलांच्या अडचणी राज्य सरकारने तात्काळ समजून घ्याव्या. याबाबत राज्यात ठीक ठिकाणी वकिलांनी आंदोलन केल्याने त्यांचे प्रश्न तीव्र झाल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक येथे रामेश्वर बोराडे या वकिलावर त्यांच्या कार्यालयात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचे तीव्र पडसाद न्यायालयाच्या कामकाजावर झाले होते. बार असोसिएशनने याबाबत आवाज उठवत धरणे धरले होते.
अहिल्यानगर येथील आढाव या वकिलाच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आला. त्यात राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या दांपत्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वकिल्यांमध्ये या प्रश्नांवर मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या निमित्ताने वकिल्यांमध्ये निर्माण झालेली असुरक्षेची भावना तातडीने दूर करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.
राज्यातील वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. गंभीर विषय असूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याची टीका आमदार तांबे यांनी केली.
राज्यातील वकिलांना आपले काम कोणत्याही दबावाशिवाय करता यावे, यासाठी योग्य वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे.यासंदर्भात शासनाने वकील संरक्षण कायदा निर्माण करण्यासाठी तातडीने पावले टाकावीत. बिहार, झारखंड या राज्यांमध्ये वकिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्र याबाबत मागे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात नाशिक वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयात आंदोलन करण्यात आले होते. वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे धरले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल कडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. वकिलांची सुरक्षा हा या निमित्ताने ऐरणीवर आलेला विषय आहे.