मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला रेल्वे स्थानकावर साकारतोय पक्का सर्क्युलेटिंग एरिया*

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर सर्क्युलेटिंग एरियामुळे वर्षाचे बाराही महिने रेल्वेत कांदा, मकासह इतर शेतमालाचे लोडींग आणि खते, सिमेंट यांचे अनलोडींग अखंडितपणे करता येणार

 

येवला, २८ ऑक्टोबर: येवला. एक ऐतिहासिक आणि शेतकरी-व्यापाऱ्यांच्या आर्थिक हिताशी निगडित असा प्रकल्प येवला रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर सुरू झाला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वर्षभराच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश मिळून आता येवला रेल्वे स्थानकावर पक्क्या सर्क्युलेटिंग एरियाचे बांधकाम सुरू झाले आहे. या आधुनिक सुविधेमुळे येवला परिसरातील शेतकऱ्यांसाठी वर्षाचे बाराही महिने कांद्यासह इतर शेतमाल मालगाडीत चढवणे आणि खते, सिमेंट यांसारखा माल उतरविणे हे काम सुकर होणार आहे. हा प्रकल्प शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या जीवनावर होणाऱ्या आर्थिक इजेचे निर्मूलन ठरणार आहे.

 

शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वाहतूकीच्या गरजा लक्षात घेणारा हा प्रकल्प मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. सध्या येवला रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावरील सर्क्युलेटिंग एरिया साध्या पद्धतीचा असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या अडचणी निर्माण होत. चिखल, खड्डे आणि गाडीचे चाक धसणे अशा समस्यांमुळे माल चढविणे-उतरविणे गैरसोयीचे होत असे आणि अनेकदा हे काम पूर्णपणे थांबवावे लागत असे. याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात व्यापाऱ्यांना शेतमाल पाठविणे आणि आलेला माल उतरविणे अशक्य होत असे. या सर्व अडचणींचा सर्वात मोठा फटका शेतकरी बांधवांनाच बसत होता. त्यांचा माल वेळेत पोचू शकत नव्हता आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.

 

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेऊन राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने या मालधक्क्याचे आधुनिकीकरण व सुधारणेसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. या दिशेने ठोस पाऊल म्हणून दि. २ जानेवारी रोजी रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक श्री. धर्मवीर मीना यांना आणि नंतर ११ सप्टेंबर रोजी थेट रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या आवश्यक सुधारणेबद्दल मागणी मांडली गेली. मंत्री भुजबळ यांच्या या सकारात्मक आणि दूरदृष्टीच्या पाठपुराव्याला रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सर्क्युलेटिंग एरियाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाचे आभार मानण्यात आले आहे.

 

रेल्वे मालवाहतूक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी सर्क्युलेटिंग एरियाचे विशेष महत्त्व असते. मालगाडी या भागात उभी राहते आणि एकाच वेळी मालगाडीच्या सर्व ४२ ते ५८ वाघिणी मावतील इतका लांब हा एरिया असतो. साधारण ७५० मीटर लांबी आणि ३० मीटर रुंदी असलेल्या या एरियामध्ये एका वेळी मालगाडीतील माल उतरवून घेण्यासाठी किंवा माल चढविण्यासाठी एका वाघिणीसमोर तीन ट्रक उभे राहू शकतात, म्हणजेच एकावेळी तब्बल १२६ ट्रक उभ्या राहू शकतात. हा प्रशस्त एरिया असल्याने मालवाहतूक झाल्यानंतर वाहनांच्या गर्दीतून ट्रक सहजतेने वळवून पुन्हा विनाअडथळा बाहेर पडता येतील.

 

या नव्या सर्क्युलेटिंग एरियामुळे येवला रॅक पॉइंट कार्यान्वित करणे देखील शक्य होईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता पावसाळ्याच्या काळात देखील येवला परिसरातून उत्तर भारतात पाठविला जाणारा कांदा, मका यांसारखा शेतमाल मालगाडीत चढविणे आणि खते, सिमेंट आदी माल उतरवून घेणे सहज शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मिळणारा आणखी एक मोठा फायदा म्हणजे विलंब शुल्काचे नुकसान टळणे. कोणतीही मालगाडी आल्यानंतर त्यात शेतमाल चढविण्यासाठी ठराविक अवधी असते, त्या अवधीत मालगाडी लोड न झाल्यास रेल्वेकडून विलंब शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क आता टळणार असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबणार आहे.

 

या सर्क्युलेटिंग एरियासाठी नगर-मनमाड महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. ७४ पासून अप्रोच रोड बनवण्यात आला आहे. तसेच कोटमगाव उड्डाणपुलापासून देखील अप्रोच रोड प्रस्तावित असून त्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. या बरोबरच मंत्री छगन भुजबळ यांनी १७ मार्च रोजी रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक श्री. धर्मवीर मीना यांना पत्र लिहून या ठिकाणी कव्हर्ड गुड्स शेडची मागणी देखील केली आहे. ही शेड झाल्यास पावसाळ्यात मालाची चढउतर आणखी सुरक्षित होईल.

 

येवला मतदारसंघातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अशा विविध कामांच्या माध्यमातून छगन भुजबळ आगामी काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे जाहीर केले आहे. येवला रेल्वे स्थानकावरील हा प्रकल्प हा केवळ एक बांधकाम प्रकल्प राहिलेला नसून शेतकरी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.