मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश, नाशिक टपाल कार्यालय देशातील पहिले ‘‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’’

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून मंजुरी, २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष टपाल तिकीट देखील प्रसिद्ध होणार

नाशिक, १८ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक शहराचे मुख्य टपाल कार्यालय ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून गौरवण्यात आले असून, हा मान मिळवणारे नाशिक हे देशातील पहिलेच टपाल कार्यालय ठरले आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा सकारात्मक पाठपुरावा आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रतिसादाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

जानेवारी २०२५ मध्ये भारतीय टपाल विभागाने देशभरातील सर्व पोस्टल वर्तुळांकडून ‘आयकॉनिक टपाल कार्यालये’ निवडण्यासाठी प्रस्ताव मागवले होते. या प्रक्रियेअंतर्गत फिलॅटेली (टपाल तिकीट संग्राहकत्व) प्रोत्साहनासाठी जास्त वर्दळ असलेली कार्यालये आणि फिलॅटेली ब्युरोचे मानकीकरण यावर भर देण्यात आला होता. नाशिकमधील मुख्य टपाल कार्यालयात फिलॅटेली ब्यूरो आधीपासूनच स्थापन केले गेले आहे, या वस्तुस्थितीनेही या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली.

मंत्री छगन भुजबळ यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन नाशिकचा अध्यात्मिक, सांस्कृतिक, खगोलशास्त्रीय आणि ऐतिहासिक वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडे ठोस प्रस्ताव सादर केला. त्यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना २८ फेब्रुवारी २०२५ आणि नंतर २६ जुलै २०२५ रोजी पत्राद्वारे नाशिकचे मुख्य टपाल कार्यालय ‘आयकॉनिक’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर, प्रयागराज महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावर देखील एक विशेष स्मृतिचिन्ह टपाल तिकीट प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

या सर्व मागण्यांना केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. परिणामी, २०२७ मध्ये भरवण्यात येणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह टपाल तिकिटे ही विशेष प्रसंगी प्रसिद्ध होणारी मर्यादित आवृत्तीची तिकीटे असतात, जी संग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतात.

नाशिक हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे होणारा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक-सांस्कृतिक सोहळा मानला जातो. या मेळ्यादरम्यान सुमारे पाच कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये येतात. अशा प्रचंड वर्दळीमुळे फिलॅटेली संग्राहकत्वाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. नाशिक अध्यात्मिक राजधानी आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून फिलॅटेली हब म्हणून आदर्श ठरेल. टपाल विभागाला २०२७ च्या कुंभमेळ्यादरम्यान पर्यटक आणि भाविकांमध्ये टपाल तिकीट संग्राहकत्वाचा प्रचार आणि प्रसार करता येईल.

या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि केंद्र सरकारच्या पातळीवर झालेला सहयोग हे यशस्वी निकालाचे रहस्य ठरले आहे. नाशिक शहर मुख्य टपाल कार्यालयाचा ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून देशभरात झालेला समावेश ही केवळ नाशिकचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. यामुळे देशभरात नाशिकची मानगौरव उंचावली गेली आहे.

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लौकिकासाठी मंत्री भुजबळ यांच्याकडून विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.