मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातील विविध विकास विकास प्रकल्पांचा घेतला सखोल आढावा

पुणेगाव-दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश; विंचूर-लासलगाव रस्ता, पाणीपुरवठा योजना, बळीराजा पथ योजनेसह विविध प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश"

येवला, दि. १९ फेब्रुवारी २०२६: येवला मतदारसंघातील आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत येवला आणि निफाड तालुक्यातील पाणीटंचाईचे नियोजन, प्रलंबित विकासकामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. मंत्री भुजबळ यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि जनतेला दिलासा देणारे नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

बैठकीत मंत्री भुजबळ म्हणाले की, आगामी उन्हाळ्यात ज्या गावांना पाण्याची आवश्यकता भासणार आहे, त्यांच्या मागणी अर्जानुसार तातडीने टँकरचे नियोजन करण्यात यावे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणतीही नागरी अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच कालबद्ध योजना आखावी, असे ते म्हणाले. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्याही नियोजनावर त्यांनी भर दिला.

यावेळी पुणेगाव-दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्णत्वास नेण्याचे आदेश मंत्री भुजबळ यांनी दिले. या कालव्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय होणार आहे. तसेच या कालव्यासाठी मंजूर झालेल्या गेटची कामेही तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिल्या.

बैठकीत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात आला. येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांची प्रगती तपासताना मंत्री भुजबळ यांनी या योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या योजनांमुळे शेकडो गावांतील हजारो नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे.

मंत्री भुजबळ यांनी विंचूर-लासलगाव रस्त्याच्या कामांचाही आढावा घेतला. हे काम खंड न पाडता समन्वयाने सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच भरवस फाटा ते कोपरगाव हद्द काँक्रीट रस्ता आणि पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्ता या महत्त्वपूर्ण रस्ते प्रकल्पांच्या कामांनाही गती देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजनांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्री भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी करण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याची कामे शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

याशिवाय येवला पोस्ट ऑफिस, सखी वन स्टॉप सेंटर आणि अल्पसंख्यांक महाविद्यालय या सुविधांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या सूचनादेखील मंत्री भुजबळ यांनी दिल्या. येवला शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारत क्रमांक २ साठी नगररचना विभागाची परवानगी घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आदेश देतानाच महावितरणने विजेबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या. तसेच घरकुल योजनेअंतर्गत प्रलंबित कामांसाठी आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त करून एकत्रित बैठकीच्या माध्यमातून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे, येवला प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता इमरान शेख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सर्वसमावेशक आढावा बैठकीमुळे येवला मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून उन्हाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईसाठी प्रशासन सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.