भुजबळांच्या प्रयत्नांतून ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; इगतपुरी खत रेक पॉईंटला मंजुरी

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खत पुरवठ्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक धोरणात्मक निर्णय

नाशिक, २२ नोव्हेंबर : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रसायन व खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी इगतपुरी येथे नव्या खत रेक पॉईंटला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खतपुरवठा सुलभ करण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान पुरवठा साखळीत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी घेण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नाशिक रोड रेक पॉईंटच्या क्षमतेत येणारी वाढ:
सध्या नाशिक रोड रेक पॉईंट हा देशातील सर्वाधिक व्यस्त गुड्स शेड्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दरवर्षी सुमारे १९,४५९ वॅगन्स तसेच दरमहा ५८ पेक्षा अधिक रेक्स येत असतात. मात्र कुंभमेळा-२०२७ च्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यात येणार असल्याने, कुंभमेळ्याच्या काळात नाशिक रोड स्टेशनचा वापर प्रवासी व्यवस्थापनासाठी केला जाणार आहे. यामुळे नाशिक रोड रेक पॉईंटवर इतक्या मोठ्या प्रमाणात खते उतरविणे कठीण झाले असते आणि खतपुरवठ्यात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असती.

इगतपुरी रेक पॉईंटचे फायदे:
नव्या इगतपुरी रेक पॉईंटमुळे नाशिक रोड रेक पॉईंटवरील दबाव लक्षणीय प्रमाणात कमी होईल आणि मालवाहतूक अधिक संतुलित होईल. आता नाशिक जिल्ह्यात नाशिक रोड आणि इगतपुरी असे दोन प्रमुख रेक पॉईंट्स उपलब्ध होतील. यामुळे खताची आवक अधिक वेगाने, नियमित आणि मुबलक प्रमाणात होऊ शकेल. शेतकऱ्यांना मोठ्या मागणीच्या काळातही तुटवडा भासणार नाही. तसेच नाशिक रोड स्टेशनवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा :
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की नाशिकच्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे हित हेच त्यांचे सर्वोच्च ध्येय आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे नाशिकच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ते कार्यरत राहणार आहेत. शेतकऱ्यांना अखंड खतपुरवठा मिळावा यासाठी त्यांनी दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय रसायने व खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र लिहून इगतपुरी येथे खतांचे रेक पॉईंट मंजूर करण्याची मागणी केली होती.

जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी राहणार फायदेशीर:
या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर व सर्व दक्षिण नाशिक भागाला थेट फायदा होणार आहे. या तालुक्यांमध्ये सर्वाधिक शेती क्षेत्र आहे. त्यामुळे या भागातच खतांचा रेक पॉईंट उपलब्ध झाल्याने वाहतूक अंतर कमी होईल, खते जलदगतीने तालुका स्तरावर पोहोचतील, वितरण खर्च कमी होईल आणि वेळेवर वितरण शक्य होईल. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे खतांच्या खर्चातही काही प्रमाणात घट होऊन शेतकरी बांधवांना यांचा आर्थिक फायदा होणार आहे.

पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेची शक्यता:
इगतपुरी येथील टिळोळी यार्डमधील गुड्स शेडच्या सध्या तात्पुरत्या सहा महिन्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधेला कायमस्वरूपी दर्जा मिळण्याचा मार्ग देखील यामुळे मोकळा झाला आहे. यामुळे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या गुंतवणुकीत वाढ, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती यांनादेखील चालना मिळेल.

हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या शेतकऱ्यांना खतांच्या पुरवठ्यासाठी मोठ्या अंतरावरून वाहतूक करावी लागते, ज्यामुळे वेळेचा व खर्चाचा नुकसान होतो. नव्या रेक पॉईंटमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. शिवाय, कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही खतपुरवठा अबाधित राहील याची खात्री देखील यामुळे मिळाली आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी संघटनांनी देखील हा निर्णय स्वागतार्ह ठरल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.