भुजबळांच्या प्रयत्नांतून कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुसज्जता वाढणार, होल्डिंग एरियाच्या कामास मंजुरी

२०२७च्या सिंहस्थासाठी गर्दी व्यवस्थापनास कायमस्वरूपी व तात्पुरता अशा दोन होल्डिंग एरियाच्या कामांना रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी, एकावेळी सुमारे १०,००० प्रवासी थांबू शकतील अशी सर्वसुविधायुक्त व्यवस्था उभारण्यात येणार

नाशिक: आगामी २०२७ मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक पायरी म्हणून कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area – PHA) उभारण्यासाठीच्या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाकडून अखेर मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळवून देण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे असे मानले जात आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यासाठी देशातील प्रमुख ७३ स्थानकांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा समावेश होता. मंत्री छगन भुजबळ यांनी दि. १७ मार्च २०२५ रोजी पत्राद्वारे ही मागणी केली होती.

मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई (CSMT) कडून दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार, या प्रकल्पाचे स्वरूप आणि तपशील स्पष्ट झाले आहेत. नाशिक रोड स्थानकावर एक कायमस्वरूपी आणि एक तात्पुरता असे दोन स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारले जाणार आहेत. प्रत्येक एरिया अंदाजे ५००० प्रवाशांची क्षमता बाळगेल, अशी योजना आहे. या दोन्ही एरियामध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वॉशबेसिन तसेच पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. तात्पुरत्या होल्डिंग एरियामधील स्वच्छतागृहे पोर्टेबल प्रकारची असतील, ज्यामुळे गरजेनुसार ती हलविणे सोपे जाईल.
होल्डिंग एरियाच्या आत प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांची योजना आखण्यात आली आहे. त्यामध्ये तिकीट काऊंटर, जनतेसाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली (Public Address System), माहिती देणारे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, निरीक्षणासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, प्रवाशांचे सामान तपासण्यासाठी स्कॅनर आणि मार्गदर्शनासाठी पुरेसे साइनेज बोर्ड यांचा समावेश असेल. याशिवाय, संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन केले जाईल. हे केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी देखरेखीसाठी आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांनी सुसज्ज असेल. तात्पुरता होल्डिंग एरिया जर्मन हँगर प्रकाराचा असून, पावसाळ्यात येणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी तो पूरक ठरेल.

२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान सुमारे ३ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची अपेक्षा आहे, जी संख्या २०१५ च्या सिंहस्थाच्या तुलनेत जवळपास ५० पटीने अधिक आहे. NSG-2 श्रेणीतील नाशिक रोड स्थानकावर या भाविकांचा मोठा ओघ असेल. कायमस्वरूपी होल्डिंग एरियाच्या मदतीने उत्सवाच्या काळात गर्दी नियंत्रित करण्यात येऊन, प्रवाशांना त्यांच्या गाड्या येईपर्यंत स्टेशनच्या बाहेरील प्रतीक्षा क्षेत्रातच थांबवले जाईल. फक्त आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येईल.

या व्यतिरिक्त, स्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी इतरही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. प्री-तिकीट क्षेत्रामध्ये अंदाजे २७०० प्रवासी एकाच वेळी बसू शकतील. तिकीट क्षेत्रामध्ये सुमारे ३१०० प्रवाशांच्या सहज हालचालीची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. तर पोस्ट-तिकीट क्षेत्रामध्ये सुमारे १३५० प्रवाशांना रांगेत उभे राहणे, सुरक्षा तपासणी आणि सामान स्कॅनिंगसाठी पुरेशी जागा मिळेल.

या सर्व आधुनिक सुविधा पूर्ण झाल्यास, कुंभमेळ्यादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होऊन भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर अशी धार्मिक यात्रा पूर्ण करता येईल. मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण कटिबद्धता दर्शविली आहे आणि ही महत्त्वाची सुविधा वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत, असे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.