नाशिक,दि.७ फेब्रुवारी :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील भारतीय पोस्ट विभागाच्या इंट्रा सर्कल हबचे (ICH) श्रेणीवर्धन करून नॅशनल सॉर्टींग हब (NSH) मंजूर करण्यात आले आहे. या नवीन हबचे नुकतेच ४ जानेवारी रोजी उद्घाटन झाले असून ते कार्यान्वित देखील झाले आहे. यामुळे आपल्या नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांसाठी स्पीड पोस्ट व स्पीड पार्सलसारख्या सुविधा अधिक वेगवान होणार आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून नाशिकच्या ICH चे NSH मध्ये श्रेणीवर्धन करण्याची मागणी केली होती. दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. याबद्दल ज्योतिरादित्य सिंधिया यांचे छगन भुजबळ यांनी आभार मानले आहे. हे NSH केंद्र कार्यान्वित देखील झाले आहे.
इंडिया पोस्टकडून मेल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट (MNOP) अंतर्गत देशांतर्गत स्पीड पोस्ट वस्तूंच्या प्रसारणासाठी हब आणि स्पोक यंत्रणा सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत यासाठी देशातील एकूण ९४ मुख्य केंद्रे स्पीड पोस्ट हब म्हणून निवडली गेली, ज्यांना नॅशनल सॉर्टिंग हब (NSH) असे नाव देण्यात आले आहे. यात २०२२ मध्ये समाविष्ट झालेले ठाणे NSH हे सर्वात शेवटचे केंद्र होते. त्यानंतर आपले नाशिक देशातील ९५ वे NSH केंद्र म्हणून कार्यान्वित झाले आहे.
NSH हे येणाऱ्या पत्रांचे मेल्स शिपमेंट त्यांच्या मंडळातील ICH ला जोडलेल्या डिलिव्हरी पोस्ट ऑफिसमध्ये पाठविण्यास जबाबदार आहेत. त्याच धर्तीवर ते मंडळ आणि मंडळाबाहेरील NSH आणि ICH मध्ये बाह्य पत्राचे मेल्स शिपमेंट पाठविण्यास जबाबदार असतात. कोणतेही स्पीड पोस्ट/पार्सल हे सुरुवातीला सब पोस्ट ऑफिस, मग हेड पोस्ट ऑफिस, नंतर ICH, त्यानंतर NSH आणि मग पुढे विहित ठिकाणचे हेड पोस्ट ऑफिस आणि त्यानंतर पुन्हा उलट क्रमाने थेट पत्त्यापर्यंत अशा प्रकारे प्रवास करते. आपल्या नाशिकमध्ये ICH पर्यंतच्या सुविधा आहेत, परंतु नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी NSH हे मुंबई येथे होते. नंतर ते ठाणे येथे देण्यात आले, परंतु त्याचा या जिल्ह्यांना विशेष फायदा झाला नाही. नाशिक ICH मुंबई NSH अंतर्गत असल्याने कोणतेही पत्र इच्छित स्थळी पोहोचण्याच्या प्रक्रियेत एक दिवस अतिरिक्त वाढून ते तिसऱ्या दिवशी पोहचत होते. यात नाशिक ते मुंबई APTMO असा होणारा पत्रांच्या प्रवासाचा एक दिवस अधिकचा वेळ नाशिक NSH मुळे वाचणार असून यापूर्वी दिल्ली येथे तीन दिवसात जाणारे स्पीड पोस्ट पत्र आता दोन दिवसात पोहचणे शक्य होणार आहे.
विविध शासकीय मुख्यालये, कार्यालये, लष्कराची छावणी, नामांकित शिक्षण संस्था असलेल्या आपल्या नाशिक महानगरात NSH ची नितांत गरज होती आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधाही उपलब्ध होत्या. तरीही अद्याप या ठिकाणी NSH नव्हते. नाशिक येथे विमानतळ कार्यान्वित झालेले असल्याने देशातील अनेक शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इंट्रा सर्कल हब (ICH) चे श्रेणीवर्धन करून नॅशनल सॉर्टींग हब (NSH) मध्ये रूपांतरित करण्याची मागणी प्रस्तावित होती. ती मागणी मान्य होऊन हे NSH कार्यान्वयीत झाल्याने नाशिकमधून थेट देशभरात पत्र व पार्सल पाठवता येणे शक्य होणार आहे. तसेच यासाठीचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच नाशिकमध्ये विमानसेवा पुरवणाऱ्या विमान कंपन्यांना देखील व्यवसायवाढीसाठी या मेल कार्गोचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. आगामी काळात देशातील विविध शहरांशी जसजशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढेल, तसे या सेवेचा देखील विस्तार होणार आहे.