नाशिकच्या पौराणिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला वेग
आ. पंकज भुजबळ यांच्याकडून सीतागुंफा ते रामकुंड दरम्यान स्थळांची सविस्तर पाहणी
नाशिक | ५ एप्रिल : नाशिक शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवा चेहरा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पासाठी आज विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सीतागुंफा ते रामकुंड दरम्यानच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी नदी परिसरातील धार्मिक स्थळांचे जतन, पर्यावरणपूरक विकास आणि भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट ठरणार आहे.
या पाहणीवेळी आमदार भुजबळ यांनी श्री. देवांग जानी यांच्याकडून रामायणकाळाशी निगडीत स्थळांची सखोल माहिती घेतली. रामकुंड, सीता कुंड, धनुष कुंड, लक्ष्मण कुंड, पंचरत्नेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर महादेव मंदिर, श्रीरामकालीन भुयारी मार्ग आणि “त्रिवध” सारख्या अनेक पवित्र स्थळांच्या ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वावर चर्चा झाली.
पंचवटी परिसरातील गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यावरही भर देण्यात आला. इंद्रकुंड ते गोमुख या मार्गावर अरुणा नदीचे पुनरुज्जीवन करणे, अरुणा-गोदावरी संगम पूर्ववत करणे व भाविकांना शुद्ध पाण्याचा अनुभव देणे या उद्दिष्टांसह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
आ. भुजबळ यांनी सांगितले की, “रामकाल पथ” हा प्रकल्प नाशिक शहराच्या धार्मिक पर्यटनाला नवी ओळख देईल. लाखो भाविकांना प्रभू श्रीराम, सीतेचा आणि लक्ष्मणाचा वास्तवाचा अनुभव घेता येईल. ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक जाणीव जागवणारी योजना आहे.”
या प्रकल्पासाठी शासन, धार्मिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य घेत संपूर्ण अभ्यासाधारित आराखडा तयार करण्यात येत आहे. यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.