नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध- छगन भुजबळ

निमा-आयमाच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी बैठकीत ठराव; आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, ड्रायपोर्ट, आयटी पार्कसह अनेक प्रकल्पांना प्राधान्य-छगन भुजबळ

नाशिक, दि. २१ ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण आहे आणि औद्योगिक विकासासाठी राज्य सरकार सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा) व औद्योगिक संघ (आयमा) यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंत्री भुजबळ यांनी यावेळी नाशिकमध्ये मेगा प्रकल्प व मोठे उद्योग येण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांसाठी आवश्यक सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक कारखाने शहराच्या बाहेर असणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे, नाशिकमध्ये कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र तपोवनातील साधुग्रामच्या जागेत विकसित करण्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक परवानगी व अनुषंगिक बाबींसाठी तातडीने कार्यवाही करावी.

श्री. भुजबळ यांनी अंबड येथे टेस्टिंग लॅब व फायर स्टेशन कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. त्यांनी औद्योगिक वसाहतींमध्ये पुढील पन्नास वर्षांचा विचार करून ड्रेनेज लाइन विकसित करण्याचे आणि भुयारी गटारींचे काम करण्याच्या सूचना दिल्या. आगामी सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान होणाऱ्या रिंग रोडमुळे औद्योगिक वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिकच्या औद्योगिक व व्यापार व्यवस्थेच्या प्रगतीसाठी निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना मंत्री यांनी या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी पन्नास एकर जागेची मागणी असल्याचे नमूद करून ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे सांगितले.

राजूरबहुला येथील राखीव पंचवीस एकर जागेत आयटी पार्क विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. नाशिकमधील अंबड व सातपूर येथील सीटीपीई केंद्रे लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावीत, असे मंत्री यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक विकासाच्या गरजा लक्षात घेता नाशिकसाठी स्वतंत्र चारशे केव्हीचे वीजपुरवठा सबस्टेशन उभारण्याची आवश्यकता असल्याचे ध्वनित केले. शेवटी, नियो मेट्रो विकसित न करता नाशिक शहर व परिसराला जोडणारी नियमित मेट्रो विकसित करण्यास प्राधान्य द्यावे, याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत दिल्या.

या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौघरी, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, मनीष रावल, योगिता आहेर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.