आ. सत्यजीत तांबे यांचे साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन
साकुर रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
अहिल्यानगर, २८ मे : साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा सुधारण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णालयाच्या वर्तमान स्थितीची पाहणी करून आमदार तांबे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
साकूर ग्रामीण रुग्णालय हा आमदार सत्यजीत तांबे यांच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प असून, त्याच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी या संस्थेला विशेष लक्ष दिले आहे. २०१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी या रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. २०१४ मध्ये भूमिपूजन झाले आणि २०१६ मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे रुग्णालय साकूरमध्ये सुरू झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाला महत्त्व देऊन तांबे यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते.
सध्या या रुग्णालयात दरमहा १० ते १५ प्रसूती होत असून, दररोज सुमारे १२५ रुग्णांची तपासणी केली जाते. अॅडमिट रुग्णांची संख्या सुद्धा १० ते १५ इतकी असते, ज्यावरून येथील सेवेची गरज स्पष्ट होते. मात्र, इमारतीच्या दुरुस्तीच्या गरजा आणि इतर काही अडचणी अजूनही निराकरण झाल्या नाहीत. या समस्यांबाबत आमदार तांबे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद बांबळे आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली.
“निधी मिळेपर्यंत पाठपुरावा करीन” – सत्यजीत तांबे
आमदार तांबे यांनी स्पष्ट केले की, “साकूर ग्रामीण रुग्णालय हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून आरोग्य विभागाकडे पाठवावा. त्यानंतर मी स्वतः योग्य निधी मिळेपर्यंत पाठपुरावा करीन. येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने उर्वरित सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
या भेटीदरम्यान कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यासह इतरही अनेक जण उपस्थित होते. आमदार तांबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा सक्रिय सहभाग सुरू आहे. निधीच्या अभावामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रतिबद्धता दर्शविली आहे. या रुग्णालयातील सेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्याच्या सुधारणेसाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.