शिव छत्रपतींच्या इतिहासाला CBSE अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्याची – आमदार तांबे यांची सभागृहात मागणी
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त 68 शब्दांत उल्लेख!" – आ. सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत आक्रमक; राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आ. तांबे यांच्यासह दिल्लीला जाऊन केंद्राशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन
मुंबई, १८ जुलै : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसई (CBSE)च्या धर्तीवर एनसीईआरटी (NCERT)चा अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, या अभ्यासक्रमात एक गंभीर त्रुटी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानसभेत मोठ्या जोरदार शब्दांत उठवली. त्यांनी सांगितले की, पहिली ते दहावीच्या CBSE इतिहासाच्या अभ्यासक्रमात एकूण 2200 पानांच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ 68 शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे. ही परिस्थिती अत्यंत निंदनीय असून, महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास शिकवला गेला पाहिजे, अशी भूमिका तांबे यांनी घेतली.
आमदार तांबे यांनी यावर टीका करताना म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हेत, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेने, युद्धनीतीने आणि प्रशासनिक कौशल्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली. अशा महापुरुषाचा इतिहास फक्त 68 शब्दांत सांगणे हे त्यांच्या योगदानाचा अपमान आहे.
SCERT ने प्रस्ताव, पण केंद्राची भूमिका काय?
आमदार तांबे यांनी स्पष्ट केले की, या विषयावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT)ने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT)कडे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अधिक विस्तृत समावेश करण्याचा प्रस्ताव पाठवला असला तरी, केवळ प्रस्ताव पाठवून काम भागणार नाही. यासाठी राज्य शिक्षणमंत्र्यांनी स्वतः दिल्लीला जाऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते. त्यांनी शासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की, “शिवाजी महाराजांच्या इतिहासाला योग्य स्थान मिळावे यासाठी शासनाची पुढील कृती काय आहे?
दिल्लीला जाऊन पाठपुरावा करू-राज्यमंत्री पंकज भोयर:
या मुद्द्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, CBSEचा अभ्यासक्रम NCERT तयार करते, तर राज्यस्तरीय अभ्यासक्रम SCERTच्या जबाबदारीवर असतो. भोयर यांनी आमदार तांबे यांचा मुद्दा योग्य असल्याचे मान्य करत म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव अभ्यासक्रमात झाला पाहिजे.”
त्यांनी सांगितले की, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासाठी आधीच दिल्लीला जाऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली आहे. त्यावेळी शिवाजी महाराजांचा इतिहास CBSEच्या 7वी आणि 10वीच्या इतिहास पुस्तकांमध्ये सन्मानपूर्वक समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. तसेच, या मुद्द्यावर पूर्ण गंभीरतेने काम करण्यात येईल आणि आवश्यकता पडल्यास आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह राज्य शासनाचे प्रतिनिधी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करतील, असे आश्वासन भोयर यांनी दिले.
शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची गरज:
हा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, राष्ट्रीय महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याचा इतिहास संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे केवळ ऐतिहासिक न्यायाचा प्रश्न नाही, तर भारतीय एकात्मतेचेही प्रतीक आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी हा मुद्दा उच्च पातळीवर उठवून राज्य शासनाला कृती करण्यास प्रवृत्त केले आहे. आता, केंद्र सरकार या बाबतीत कोणती ठोस पावली उचळते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.