रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्याहून सरस असलेला, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत असलेला एक “हिरा” – सत्यजीत तांबे !
अलीकडच्या काळात, विशेषतः २०१९ नंतर सध्या विरोधी पक्षात असलेल्या दोन पक्षांना (राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट) राज्यभरात तरुणाईचा प्रचंड पाठिंबा लाभला. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल असलेलं आकर्षण याचं एक कारण होतंच, पण रोहित पवार व आदित्य ठाकरे यांनी तरुणांना घातलेली भुरळ हेही एक प्रमुख कारण होतं. तरुणांचं जे प्रेम मिळवण्यासाठी स्वपक्षातील ज्येष्ठ नेते अनेक वर्षे झगडत होते ते प्रेम या दोन युवा नेत्यांनी अल्पावधीत मिळवलं.
रोहित पवार यांच्याबद्दल माझं वेगळं मत असू शकतं, पण आदित्य ठाकरे मात्र या काळात अधिक प्रगल्भ नेतृत्व म्हणून पुढे आले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी अजित पवारांसोबत जुळवून घेतले होते. अजित पवारांनी त्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते, मात्र रोहित पवारांनाच पक्षातून व कुटुंबातून योगेंद्र पवारांच्या रूपात नवीन नेतृत्व उदयास आलेले धोक्याचे वाटत होते. म्हणूनच, बारामतीत अजित पवारांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी रोहित पवारांनी प्रयत्न केले. चर्चेचा केंद्रबिंदू कायम स्वतःवर राहावा यासाठी रोहित पवारांचा सतत प्रयत्न असतो. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी प्रदेशात बसलेल्या काही व्यक्तींच्या माध्यमातून ब्राह्मण द्वेषाची भाषा निवडली, अर्थातच ही त्यांची रणनीती आहे.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा प्रवास मात्र काहीसा दमदार वाटतो, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला “कॉर्पोरेट रूप” मिळवून दिले. आदित्य ठाकरेंसोबत जवळीक असलेल्या एका पत्रकाराच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरे हे इंग्लंडच्या टोनी ब्लेअर यांच्याप्रमाणे विचार करतात, काळाच्या ५ वर्षे पुढे.. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही जर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आदित्य ठाकरेंसोबत काम करण्याचा अनुभव विचारला, तर कोणीही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. भारतीय जनता पक्षासोबत हरकत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, तसेच पर्यावरण व प्रदूषण नियंत्रणासाठी त्यांनी केलेलं काम हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होतं. मात्र, अतिशय तरुण वयात त्यांच्या हाती आलेलं पक्षाचे नियंत्रण हे स्वपक्षातीलच अनेक ज्येष्ठांना खूपणारं होतं. शिवसेनेचा कॉर्पोरेट रूप ज्येष्ठांना मान्य नव्हतं, तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक बाबतीत युवा सेनेने दाखल देणेही अनेकांना मान्य नव्हतं.
महायुतीने आतापर्यंत डॉ. श्रीकांत शिंदे, सरनाईक बंधू, राणे बंधू, राम सातपुते, मोहित कंबोज, पार्थ पवार व जय पवार यांच्या रूपात तरुण चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक बाबतीत रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्याहून सरस असलेला, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दमदार वाटचाल करत असलेला एक “हिरा” देवेंद्र फडणवीस यांनी पारखला आहे, तो म्हणजे सत्यजीत तांबे. होय, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस मधून शोधलेला हा तरुण चेहरा सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य आहे. सत्यजीत तांबे यांनी वडील डॉ. सुधीर तांबे यांची टर्म संपल्यानंतर स्वतः विधान परिषदेचा मार्ग निवडला, त्यासाठी स्वपक्षानेच आडकाठी घातली असतानाही त्यांनी स्वकर्तुत्वाने विजय मिळवला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजीत तांबे यांचा शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील मूलभूत प्रश्नांबाबत अत्यंत सखोल अभ्यास आहे. १० वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, NSUI चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांचा अनुभव असल्याने त्यांचा त्यांचा जनसंपर्क हा रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे यांच्याहून अधिक खोलवर आहे. सत्यजित तांबे यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर कमालीचे प्रभुत्व आहे. त्यांनी परदेशात अभ्यास केला आहे, तसेच अनेक देशांमध्ये प्रवास करून जागतिक विकासाचा अनुभवही घेतला आहे. शहरांच्या विकासाबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक आहे, तसेच ग्रामीण भागातील समस्यांचीही त्यांना सखोल जाण आहे. कमालीचे प्रगल्भ आणि परिपक्व असलेले सत्यजीत तांबे हेच भारतीय जनता पक्षाचा “भविष्यातील तरुण नेतृत्वाचा शोध” थांबवू शकतात.
महायुतीने अशा नेतृत्वास अधिकाधिक संधी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा घेतली, त्यात ते अगदी अव्वल क्रमांकाने पास झाले आहेत. नाही… सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवास कारणीभूत नाहीत, उलट माझ्यासाठी कुटुंब प्रथम व राजकारण दुय्यम हेच त्यांनी सिद्ध केलं. अन् देवेंद्र फडणवीस हे कुटुंब फोडणारे नाहीत, तर कुटुंब जोडणारे आहेत (उदा. मुंडे कुटुंब)…!
– विक्रांत जोशी (पत्रकार)