पाचोऱ्यात रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट

तांबे यांच्या हस्ते कलावंताच्या कौशल्याचा सन्मान ; विद्यार्थ्यांशीही मनमोकळ्या गप्पा

पाचोरा, २८ एप्रिल : कला आणि कलाकार यांचं नातं केवळ प्रदर्शनापुरतं मर्यादित नसतं, तर ते हृदयाच्या गाभ्याशी जोडलेलं असतं. हेच उदाहरण पुन्हा एकदा घडले, जेव्हा शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पाचोऱ्यातील प्रतिभावंत रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर कलाकाराच्या कलेप्रती असलेल्या सन्मानभावनेचं जिवंत उदाहरण होती.

नुकत्याच पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात शैलेश कुलकर्णी यांनी आमदार तांबे यांचे रांगोळीच्या माध्यमातून व्यक्तिचित्र साकारले होते. काही वैयक्तिक कारणांमुळे तांबे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते, परंतु त्यांनी शैलेश यांना फोनवर भेटीचं वचन दिलं होतं. या वचनाची पूर्तता करत, त्यांनी २७ एप्रिल रोजी शैलेश यांच्या ‘कला छंद ड्रॉइंग आणि रांगोळी क्लास’ ला भेट दिली.

या भेटी दरम्यान आमदार तांबे यांनी केवळ शैलेश यांच्याशीच नव्हे, तर त्यांच्या क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रयत्नांचं मनःपूर्वक कौतुक केलं. त्यांनी विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा सल्लाही दिला.

या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना शैलेश कुलकर्णी म्हणाले, “दादांनी केलेली ही भेट केवळ माझ्यासाठी नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरली. आमच्या मेहनतीला मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी अत्यंत मोठा आहे.”

या सदिच्छा भेटीने कलाकाराच्या कार्याला नवे बळ मिळाले असून, सत्यजीत तांबे यांची संवेदनशीलता आणि कलेबद्दलचा आदर हा सामाजिक दृष्टिकोन समृद्ध करणारा ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.