जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी सत्यजीत तांबे यांची मागणी
मुंबई : जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जावी आणि राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सूचनांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केली. जीएसटीसंदर्भातील विविध सूचना सभागृहात सातत्याने मांडल्या जात असल्या, तरी त्या प्रत्यक्ष जीएसटी कौन्सिलपर्यंत पोहोचतात का, असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक होण्यापूर्वी विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील सदस्यांकडून सूचना मागवून महाराष्ट्राची एकत्रित भूमिका निश्चित करण्यात येणार का, तसेच सर्व सदस्यांच्या सूचनांच्या आधारे राज्य शासन सविस्तर निवेदन तयार करून महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे जीएसटी कौन्सिलसमोर ठामपणे मांडणार का, असे प्रश्न तांबे यांनी उपस्थित केले.
यावेळी उत्तर देताना मंत्री आशिष जयस्वाल यांनी तांबे यांच्या सूचनेचे स्वागत केले. सदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार करून त्या योग्य व्यासपीठावर मांडल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्याच्या आर्थिक हिताशी संबंधित विषयांवर लोकप्रतिनिधींचा अधिक सहभाग असावा आणि महाराष्ट्राची भूमिका अधिक प्रभावीपणे केंद्रापर्यंत पोहोचावी, यासाठी तांबे यांनी केलेल्या सूचनेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.