सावधान!! ट्रोलिंगच्या जमान्यात सोशल मीडियावर नव्हे तर महाराष्ट्रात एक लोकचळवळ उभी राहत आहे!

आजवर मी माझ्या राजकीय व सामाजिक पत्रकारितेच्या 3 दशकांहून अधिक कार्यकाळात अनेक पक्ष व संघटनांचे उगम पाहिले. प्रत्येक संघटना व पक्ष एक भूमिका घेऊन समाजात येतात, आपले कार्यकर्ते जमा करतात, त्यांचा एक विशिष्ट अजेंडा असतो. अनेकदा अजेंडा विधायक असतो, पण संघटन मजबूत नसते, अनेकदा संघटन मजबूत असते पण अजेंडा तितका दमदार, समाजासाठी उपयोगाचा नसतो! या सर्वांचा परिपाक म्हणजे अशा अनेक चळवळी, आंदोलने, संघटना किंवा पक्ष यांना म्हणावा तसा जनाधार लाभला नाही, त्यामुळे काळाच्या ओघात स्वाभाविकपणे यातील काही चळवळी लोप पावल्या. याउलट अलीकडच्या काळात डिजिटल क्रांतीमुळे व सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ट्रेंड्समुळे अनेकांना प्रचंड प्रसिद्धी मिळताना दिसतेय. तुमच्या डोळ्यासमोर असे प्रचंड रील स्टार उभे राहिले असतील, ज्यांनी अगदीच उथळ आणि सवंग ‘कन्टेन्ट’च्या जोरावर काही मिलियन्स फॉलोवर्स जमा केले आहेत. लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईबच्या या जमान्यातील या बहुतांश फॉलोवर्स व समर्थक मंडळींचा एकमेव अजेंडा असतो तो म्हणजे ट्रोलिंग! बहुतांश फॉलोवर्स या गोष्टींना मनोरंजन समजत सतत. परंतु या अत्यंत नकारात्मक आणि अनुत्पादक गोष्टींमध्ये आजची युवा पिढी वाहवत चालली आहे. पण सोशल मीडियावर जे दिसत तसं नसतं, हे या युवा पिढीला कोण समजावून सांगणार? एवढंच नाही तर या युवा पिढीला सावरण्याची ज्यांच्यावर जबाबदारी असते तो पालकवर्ग देखील त्यांच्याशी संवाद साधण्यापेक्षा रिल्स बघण्यात व्यग्र झालेला दिसतो, ही खूपच मोठी शोकांतिका आहे. मध्यंतरी तुम्ही Elvish Yadav हा एक काहीही कर्तृत्व नसलेला, परंतु युवावर्गात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला रील स्टार ‘बिग बॉस OTT’ मध्ये पाहिला असेल! केवळ सोशल मीडियावर अनेक मिलियन्स फॉलोवर्स आहेत, या जोरावर तो त्या स्पर्धेचा विजेता ठरला! गंमत म्हणा किंवा शोकांतिका म्हणा, पण आज तो युवा पिढीचा आयडॉल आहे आणि त्याच्याकडे काही मिलियन्स फॉलोवर्स असल्याने छत्तीसगड मुख्यमंत्री सुद्धा त्याला घेऊन फिरतात! पण या महाशयांचं ना काही कर्तृत्व, ना यांच्याकडे काही लोकाभिमुख अजेंडा! या सर्व पार्श्वभूमीवर एक जयहिंद लोकचळवळसारखी संघटना सुदृढ समाजनिर्मितीचं ध्येय घेऊन पुढे येते आणि त्यांना Elvish Yadav सारखा फक्त सोशल मीडियावरच नव्हे, तर प्रत्यक्ष ग्राउंडवर युवकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय, ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे. जयहिंद लोकचळवळचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी सुरू केलेल्या या लोकचळवळीच्या विस्ताराची धुरा आता युवा नेते, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी हाती घेतली आहे. गांधीवादी व लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे वैचारिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांना आता तंत्रज्ञान, सोशल मीडियाशी जवळीक असलेल्या एका टेक्नोसॅव्ही अशा उमद्या व्यक्तिमत्वाची साथ मिळाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यजीत तांबे हे महाराष्ट्राभरात प्रसिद्ध आणि युवावर्गात लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. नुकतीच जयहिंद लोकचळवळची आढावा बैठक एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजेच 36 जिल्ह्यांमध्ये पार पडली आणि फक्त सोशल मीडियाच नव्हे तर प्रत्यक्ष बैठकीस राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील युवा वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झालेला दिसला. शिक्षण, पर्यावरण, समाजकारण, राजकारण, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रात क्रांती घडवू पाहणारे, सध्याच्या ढवळून निघालेल्या वातावरणात सुदृढ समाजनिर्मितीच्या अजेंड्यावर काम करू इच्छिणारे असंख्य युवक स्वतःहून या बैठकांमध्ये सहभागी झाले. आमचे सर्वच्या सर्व जिल्हानिहाय प्रतिनिधी या बैठकांना आवर्जून उपस्थित होते. प्रत्येक बैठकीचा अनुभव असा होता की युवक स्वतःहून त्यांचं मत मांडत होते, तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेत होते व जयहिंद लोकचळवळ आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवण्याचा संकल्प घेऊन जात होते. एकीकडे रिल्सच्या व ट्रेंड्सच्या मायाजालात तरुणाई बुडून गेलेली असताना दुसरीकडे जयहिंद लोकचळवळ एक दिशादर्शक व शाश्वत कामाचा पॅटर्न समाजात रुजवू पहात आहे. महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहिल, मला शरद जोशींची शेतकरी चळवळ आठवते, नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, विविध आंबेडकरी चळवळी, विनायक मेंटेची शिवसंग्राम चळवळ, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा आरक्षणाची चळवळ, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, अण्णा हजारेंची भ्रष्टाचार विरोधी चळवळ अशा अनेक चळवळी महाराष्ट्राने पाहिल्या. या सर्व चाळवळींमध्ये नेतृत्व दमदार होते आणि संघटन सुद्धा मजबूत होते. त्यासोबतच या चळवळीचा अजेंडा हा समाजहिताचाच होता, त्याबद्दल दुमत नाही.

पण या चळवळी जेव्हा उभ्या राहिल्या, तेव्हा युवा भरकटलेला नव्हता, तेव्हा विखारी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. आजच्या काळात मात्र अशी चळवळ उभी राहणं कठीण आहे, असं अनेक जुनी जाणती लोकं सांगतात! पण म्हणतात ना कोणतीही संघटना किंवा चळवळ ही त्यातील 1000 कार्यकर्त्यांच्या जीवावरच तळागाळात पसरते. पण ती टिकते ती नेतृत्व गुण आणि अजेंड्यावर! जयहिंद लोकचळवळचा अजेंडा हा सर्वसमावेशक आहे, सुदृढ समाज निर्मितीचा आहे आणि विशेष म्हणजे त्याची धुरा सांभाळत आहेत युवा नेते सत्यजीत तांबे! सत्यजीत तांबे स्वतः उच्चशिक्षित आहेत, धोरणी आहेत, अभ्यासू आहेत! पण यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे डॉ. सुधीर तांबे यांच्याप्रमाणेच संवेदनशीलता व समाजासाठी आपण काहीतरी देणं लागत असल्याची जाणीवही आहे. ही जाणीव असल्यानेच ते जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यास उत्सुक आहेत. जयहिंदच्या पहिल्याच बैठकीस युवकांचा जो उदंड प्रतिसाद मिळाला, यावरून एक लक्षात येतं की आताची युवा पिढी भरकटली नसून ती चांगल्या लोकांच्या, चांगल्या ध्येयाच्या शोधात आहे. युवकांच्या या उमद्या प्रतिसादाने माझ्या मनातील त्याबद्दलचा गैरसमज दूर केलाय! मला विश्वास आहे, जयहिंद लोकचळवळ अल्पावधीतच महाराष्ट्राच्या गावागावात पोहचेल व सदृढ समाजनिर्मितीसाठी एक शाश्वत मॉडेल उभं करेल! सर्वात महत्वाचं म्हणजे ही सुरुवात आणि याच्या विस्ताराची धुरा सांभाळणारं नेतृत्व, दोन्हीही दमदार असल्याने पुढच्या 10 वर्षांत महाराष्ट्राच्या समाजकारण व राजकारणावर सुध्दा एक विधायक आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याचे काम ही लोकचळवळ नक्की करेल!

– त्रयस्थ पत्रकार

Leave A Reply

Your email address will not be published.