शिवछत्रपती पुरस्कार विजेते जिनेश सत्यन नानल यांचा सनीज वर्ल्डमध्ये गौरव
कष्ट आणि चिकाटीने मिळवलेल्या या यशाचा मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते सत्कार
पुणे, १९ एप्रिल – स्केटिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश मिळवत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावणाऱ्या जिनेश सत्यन नानल यांचा सनीज वर्ल्ड येथे मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिनेश यांना सत्कार चिन्ह देऊन गौरवण्यात आलं, तसेच त्याच्या समर्पित कष्टांची आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची मनःपूर्वक दखल घेण्यात आली.
सनी निम्हण यांनी सांगितले की, “जिनेशसारखे मेहनती आणि चिकाटीने खेळात झपाटलेले युवक हे महाराष्ट्राचं भवितव्य घडवतात. अशा खेळाडूंना योग्य वेळी पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळणं अत्यंत गरजेचं आहे, आणि खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणं ही आपली सामाजिक जबाबदारीच आहे.”
सनी निम्हण हे केवळ सामाजिक कार्यातच नाही, तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग आणि योगदान देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुढाकाराने अनेक तरुण खेळाडूंना आधार, प्रोत्साहन व मंच मिळाला आहे. या प्रसंगी त्यांनी जिनेश आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.