शरद पवारांकडून प्रति-सरकारची निर्मिती?
महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट टीम तयार.
०३ मार्च, पुणे : शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन केले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नेत्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर युवकांना अधिक संधी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शॅडो कॅबिनेटची स्थापना :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक मुंबईत शरद पवार यांच्या हजेरीत झाली. या बैठकीत महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यात आले. या शॅडो कॅबिनेटमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे, जे महायुती सरकारच्या विविध विभागांच्या कामकाजाचे विश्लेषण करतील. पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, “सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवून त्यातील कमतरता ओळखणे हा या शॅडो कॅबिनेटचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून आम्ही सरकारच्या धोरणे आणि कामकाजावर टीका-प्रतिक्रिया देऊ शकू.”
नेत्यांना विभागवार जबाबदारी :
या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे, रोहित पवार, एकनाथ खडसे, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर मराठवाडा, राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख यांच्यावर विदर्भ, जितेंद्र आव्हाड आणि सुनील भुसार यांच्यावर कोकण, तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यावर उत्तर व पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे यांसारख्या नेत्यांवर विविध प्रदेशांची जबाबदारी सोपवली आहे. शरद पवारांनी नेत्यांना पुढील तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, पक्षातील रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
शॅडो कॅबिनेट ही एक राजकीय संकल्पना आहे, ज्यामध्ये विरोधी पक्ष सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाच्या समांतर एक नेता नियुक्त करतो. या नेत्याचे कार्य संबंधित मंत्रालयाच्या धोरणांवर लक्ष ठेवणे, त्याचे मूल्यमापन करणे आणि सरकारच्या निर्णयांवर टीका आणि सुधारणांचे सूचना देणे असते. शॅडो कॅबिनेटचा मुख्य उद्देश सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवून जनतेपर्यंत त्यातील कमतरता आणि चुका पोचवणे हा असतो. ब्रिटनसारख्या देशांमध्ये ही पद्धत सामान्य आहे, जिथे विरोधी पक्ष सरकारच्या धोरणांवर प्रतिक्रिया देण्यासाठी शॅडो कॅबिनेट वापरतो. राष्ट्रवादी काँग्रेसने ही संकल्पना महाराष्ट्रात आणली आहे, ज्यामुळे सरकारच्या कामकाजावर सतत नजर ठेवली जाईल.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवी रणनीती:
राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. या रणनीतीअंतर्गत पक्षाच्या तरुण नेत्यांना अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या 7 मार्चपासून राज्यभरात पक्ष नेत्यांचे दौरे सुरू होतील, असेही खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. “नवीन चेहऱ्यांना संधी द्या. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल सादर करा,” असे आदेश पवारांनी दिले आहेत. या बदलांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय भूमिका आणि संघटना मजबूत होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.