“राज्यातील शेतकरी व वीज कंत्राटी कामगार संकटात; सरकारने वेळीच लक्ष देणं गरजेचं ” – सत्यजीत तांबे
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी महावितरण व महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. यासह कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात आज सुमारे 42,000 वीज कंत्राटी कामगार कार्यरत आहे. वीज कंपन्यांमध्ये रिक्त जागांवर या कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. या कामगारांना जोखीमेची कामं दिले जातात. परंतु या कामांसाठी कंपनीमार्फत सुरक्षा साधनांचा पुरवठाच केला जात नाही. मागील तीन वर्षांत विजेची काम करत असताना 80 कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या वीज कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता आमदार सत्यजीत तांबे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. या कामगारांना सुरक्षा साधनं पुरवली जातात का? याकडे सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचं आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एकीकडे राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आणि दुसरीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालत शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडीत अधिकच भर टाकली आहे. देशात कांद्याचे भाव वाढत असताना आणखी भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने कांद्याची निर्यात थांबवली आहे, असे आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात मत मांडले. या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेर विचार करावा, याबाबत राज्य सरकारने शिफारस करावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.