“राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा”, सत्यजीत तांबे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी !

राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 हजार शासकीय पदांची भरती करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. यानंतर विविध विभागांसाठी सुमारे 8000 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परंतु सहा महिने उलटूनही विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षाच आहे ! तसेच तलाठी भरती सारख्या परीक्षांमध्ये आढळलेल्या गैरप्रकारामुळे निकाल राखून ठेवलेला आहे. विद्यार्थ्यी या परीक्षांच्या निकालाची वाट पाहत आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या या समस्यांबाबत सरकारचे लक्ष वेधले.

राज्य शासनाने घेतलेल्या या परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करून बेरोजगार तरुणांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात केली. राज्यातील लाखो तरुणांना या निकालाची प्रतीक्षा आहे. ज्या परीक्षेत गैरप्रकार झालेला नाही, त्या परीक्षांचेही निकाल तातडीने लावावे, असेही मत त्यांनी यावेळी मांडले. यासह पुणे विभागातील मुक्त विद्यापीठ, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयामध्ये विविध शिष्यवृत्त्यांच्या योजनांचे हजारो अर्ज प्रलंबित आहेत. सरकारने या प्रलंबित शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना त्वरित देण्यात याव्यात, अशीही मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.

शिष्यवृत्तीचा अर्ज करण्याची प्रक्रिया ज्या महाडीबीटी पोर्टलवर केली जाते. ही वेबसाइटही संथगतीने सुरु असून काही दिवसांपासून महाडीबीटी वेबसाईट बंद आहे. त्यामुळे ना शिक्षण संस्थांना पैसे मिळत आहे, ना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या ! यामुळे संबंधित संस्थेचे व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने विनाविलंब प्रलंबित शिष्यवृत्ती द्यावी, अशी विनंती आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.