युपीएससीच्या रँकमध्ये झळकला तेव्हा बिरू मेंढरं चारत होता !

यमगेचा अभिमान – बिरदेव डोणे; कुटुंबाच्या कष्टांना यशाची सुंदर किनार!

यमगे (ता. कागल) येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेव सिद्धाप्पा डोणेंने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात ५५१वा क्रमांक पटकावत कुटुंबाच्या कष्टांना यशाचं तोरण बांधलं आहे. वडील सिदाप्पा व आई बाळाबाई हे दोघंही मेंढपाळ. भटक्या जीवनशैलीत दिवस काढणाऱ्या या कुटुंबाच्या परिस्थितीतही बिरदेवने जिद्द न सोडता UPSC च्या शिखरावर झेप घेतली.

लहानपणापासून मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या बिरदेवचं शिक्षण गावातील मराठी शाळेच्या व्हरांड्यातून सुरू झालं. दहावीत ९६% आणि बारावीत ८९% गुण मिळवत तो मुरगूड केंद्रात पहिला आला. पुढे पुण्यातील सीओईपीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेतलं आणि UPSC च्या तयारीसाठी दिल्ली आणि पुणे येथे दोन वर्षे अभ्यास केला. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आलं, पण तिसऱ्यांदा जिद्दीनं परीक्षा दिली आणि यश संपादन केलं.

परीक्षेच्या दिवशी तब्येत बिघडून छोटी शस्त्रक्रिया होऊनही त्याने परीक्षा दिली होती. “६६ पुस्तकांचं नियमित वाचन आणि सातत्य हाच माझ्या यशाचा पाया आहे. आई-वडिलांच्या कष्टामुळेच हे शक्य झालं,” असं बिरदेवने सांगितलं.

“पोरानं लय कष्ट केलं… आज त्याचं चीज झालं,” अशा शब्दांत वडील सिदाप्पा यांनी भावना व्यक्त केल्या.

बिरदेव डोणेचं यश ग्रामीण भागातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.