भुजबळांच्या प्रयत्नांतून शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू; मुंबईत पुरस्कारांचे वितरण

पुढील वर्षापासून ३ जानेवारीला नायगाव येथे महिला मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात होणार पुरस्कार वितरण- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

मुंबई,नाशिक,दि.१० मार्च :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार काही वर्षांपासून खंडित झाला होता. तो आज पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. हा पुरस्कार आता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ३ जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमात वितरित करण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार समारंभ आज एसएनडीटी महिला विद्यापीठातील पाटकर हॉल मुंबई येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेले मान्यवर पुणे विभाग जनाबाई सिताराम उगले,नाशिक विभाग डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी,कोकण विभाग फुलन ज्योतिराव शिंदे,छत्रपती संभाजीनगर विभाग मीनाक्षी दयानंद बिराजदार,अमरावती विभाग वनिता रामचंद्र अंभोरे,नागपूर विभाग शालिनी आनंद सक्सेना यांना सन २०२२ २३ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने १९८५ सालापासुन महाराष्ट्रात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यापासुन प्रेरणा घेवुन, समाजामधे सामाजिक व शैक्षणिक कार्य करणार्‍या महिलांसाठी , राज्याच्या सहा महसुली विभागामधुन सावित्रीबाई फुले पुरस्कार सुरू केलेला आहे. त्यामधे संबंधित महिलांचा सत्कार करण्यात येवून, २५ हजार रूपये व प्रशस्तीपत्र असे त्याचे स्वरूप होते. परंतु २०१३ पासून हा पुरस्कार बंदच होता. यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांनी दि. १० ऑगस्ट २०२३ ला पत्र देवुन, हा पुरस्कार पुन्हा सुरू करावा, तसेच या पुरस्काराचे नांव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार असे करण्यात येवुन, पुरस्काराची रक्कम ही प्रत्येकी १ लाख करण्यात येवुन, हा पुरस्कार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला, ३ जानेवारी ला त्यांच्या जन्मगावी, शासनाकडून साजरा होणार्‍या महिला मुक्ती दिन सोहळ्यात देण्यात यावा, अशी मागणी केलेली होती.यावर आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने दि.१६ जानेवारी व २ फेब्रुवारी २०२४ ला असे दोन शासन निर्णय काढुन ही मागणी मान्य केली. आज हा पुरस्कार कार्यक्रम संपन्न होत आहे याचा मला आनंद आहे.पुढील वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार ३ जानेवारी ला महिलामुक्ती दिन या शासकीय कार्यक्रमात नायगावला (जि.सातारा) वितरीत करावा अशी भुजबळ यांनी भाषणात मागणी केली.

या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढील वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा ३ जानेवारी ला “महिलामुक्ती दिन” या शासकीय कार्यक्रमात सावित्रीबाई फूले यांच्या जन्मगावी नायगावला येथे वितरित करण्याचे जाहीर केले.

कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही वेणुगोपाल रेड्डी, संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, सहसंचालक विलास नांदवडेकर,प्रकाश बच्छाव आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.