भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत
भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत
छगन भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत पोचलं आहे.
सत्तेचा अमृतकुंभ कुणाच्याच लेखी नसतो. पण मिळालेल्या सत्तेचा वापर कुणासाठी?
या प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी जेव्हा जेव्हा सत्ता हाती आली, तेव्हा तेव्हा दिलं आहे.
भुजबळांच्या वाट्याला तर हलाहल अधिक आलं. न केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मरणाला हात लावून ते परत आले. ती त्यांची विजिगीषू वृत्ती प्रत्येक संघर्षात दिसते.
सीमावासियांच्या सत्याग्रहात वेषांतर करून कर्नाटकात शिरण्याचं त्यांनी दाखवलेलं धाडस शिवसेनेचा सर्वात फायर ब्रँड नेता म्हणून त्यांना ओळख देऊन गेलं. पण त्याहून मोठं बंड त्यांनी केलं, ते मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी. ज्यांच्यावर श्रद्धा आणि निष्ठा आजही आहे, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ त्यांनी सोडली. ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना त्यांनी पक्ष निष्ठेपेक्षा अधिक महत्त्व दिलं. मंडल आयोगासाठी त्यांनी देशभर संचार केला. संघर्ष केला. राज्याराज्यात ओबीसींचे मेळावे घेतले. आज देशातील ओबीसींचे ते एक सर्वात मोठे नेते बनले आहेत. आणि जातीनिहाय जनगणनेचे पुढारकर्तेही.
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे शिल्पकार आणि ओबीसींचे सर्वांत आदरणीय नेते शरद यादव यांनीच ‘ओबीसींची उद्याची आशा आणि एकमेव उमेद’ म्हणून छगन भुजबळांचा नुकताच गौरव केला. देशातील ओबीसी चळवळीच्या नेतृत्वाची धुरा शरद यादव यांनी जणू भुजबळांच्या खांद्यावर टाकली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यामध्ये भुजबळांचा वाटा मोठा आहे. नामांतरासाठी बहुजन समाजाच्या मनपरिवर्तनात त्यांनी केलेली कामगिरी कुणीही नाकारणार नाही.
भुजबळांबद्दल अनेक अपसमज पसरवले गेले. अपसमजाचे ते अनेकदा शिकार झाले. गांधी विरोधकांना त्यांनी उपरोधाने मारलेला टोला त्यांनाच त्रासदायक ठरला होता. मराठा आरक्षणाला त्यांनी कधीच विरोध केला नाही. मात्र ते करताना कटुता येऊ नये आणि मराठा आरक्षणही सफल व्हावं यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांचा गैरअर्थ काढला गेला.
ते स्वतःच काल म्हणाले तसं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होऊ शकले असते. पण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी शरद पवारांनी जी जोखीम उचलली त्याचवेळी भुजबळांनी आपल्या निष्ठा शरद पवारांना वाहिल्या. ज्या मुद्द्यांसाठी त्यांनी सेना सोडली त्यांच मुद्द्यांसाठी त्यांनी शरद पवारांना साथ दिली. आणि त्याच मुद्दयांसाठी मुख्यमंत्री पदाच्या शक्यतेचाही मोह धरला नाही. इतिहासात याची दखल महाराष्ट्राच्या इतिहासाला घ्यावी लागेल. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीलाही त्यांच्या या त्यागाची दखल घ्यावी लागेल.
छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
– आमदार कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती