पिंपरीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय : शरद पवार

पिंपरी चिंचवड | भाजपच्या रुपाने देशावर संकट आले असून ते दूर करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे केले. तसेच, पिपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा गैरवापर झाला असल्याचे सांगत त्यांनी पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपवर सुद्धा हल्लाबोल केला. शहराचे भवितव्य घडविणाऱ्यांना पुन्हा सत्ता द्या, अशी साद घालत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच पालिकेत सत्तेत आणा, असेच सूचित करीत आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात रहाटणीतील थोपटे लॉन्समध्ये पवार बोलत होते. राज्याच्या हक्काचा जीएसटीचा तीस हजार कोटी रुपयांचा परतावा अडकवून ठेवून केंद्र सरकारने महाराष्ट्राला एकीकडे आर्थिक अडचणीत आणले आहे. तर, दुसरीकडे ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ते महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघाती आरोप पवार यांनी यावेळी केला.

अनेक मंत्री व त्यांच्या नातेवाईकांमागे या यंत्रणांच्या चौकशीचा फेरा लागूनही राज्य सरकार पडत नाही, हे पाहून आता मोठ्यांच्या मागे ही चौकशी लावण्यात आली आहे. अजित पवारांच्या बहिणींच्या मागे हा ससेमिरा लावला गेला. पण, काय करायचे ते करा. हे सरकार पडणार, तर नाहीच. उलट पाच वर्षे ते टिकणार, काम करणार आणि पुन्हा निवडून येणार, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंबईचा पोलिस आयुक्त (परमबीरसिंह) कधी गायब होईल, असे वाटले नव्हते. पण, तो इतिहासही घडला. परदेशात पळून गेल्याचा संशय असलेल्या या माजी पोलिस आयुक्तांना न शोधता त्यातूनही राज्य सरकारला त्रास कसा होईल, हे केंद्र सरकार पाहत आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.